लॉकडाऊनचे नियम तोडल्यास ‘या’ देशात एक कोटींचा दंड, तर रशियात सात वर्षे कैद
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 11:14 AM2020-04-04T11:14:42+5:302020-04-04T11:16:46+5:30
फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात.
नवी दिल्ली - जगभरातील तब्बल ९० देशांमध्ये सध्या लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सुमारे ४५० कोटी लोक आपआपल्या घरांमध्ये अडकून आहेत. ‘युएन’नुसार जगभरातील १८० देशांमध्ये शाळा-कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या आहे. ८७ टक्के लोकसंख्येवर याचा परिणाम झाला आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडू नये म्हणून वेगवेगळ्या देशात कठोर नियम करण्यात आले आहेत.
कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीत कारण नसताना घराबाहेर पडणाऱ्या व्यक्तीला २.५ लाख रुपयांचा तर लोम्बार्डी येथे चार लाखांचा दंड ठोठावण्यात येतो. तर हाँगकाँगमध्ये क्वॉरन्टाईनचा नियम तोडणाऱ्याला अडीच लाख रुपये किंवा सहा महिने कारावास असा नियम आहे. तर सौदी अरेबिया देशात सर्वाधिक दंडाचा नियम आहे. येथे आजार किंवा प्रवास हिस्ट्री लपविल्यास एक कोटींचा दंड ठेवण्यात आला आहे. जगभरात सौदी अरेबियाची दंडाची रक्कम सर्वाधिक आहे. तर ऑस्ट्रेलियात काही ठिकाणी २३ लाख रुपये दंड ठेवण्यात आला आहे.
दंडा व्यतिरिक्त अनेक ठिकाणी कारावासाची शिक्षा आहे. रशियात अँटी व्हायरस एक्टला मंजुरी देण्यात आली असून क्वॉरन्टाईनचा नियम तोडल्यास सात वर्षे कारावासाची शिक्षा ठेवण्यात आली आहे. तर मॅक्सिकोच्या युकाटमध्ये आजार लपविल्यास तीन वर्षांच्या कारावासाचा नियम आहे.
फिलीपाईन्समध्ये ठार मारण्याचे आदेश
फिलीपाईन्सचे राष्ट्रपती रोड्रीगो दुतेर्तो यांनी क्वॉरन्टाईनच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याला गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर दक्षिण आफ्रिकेत घराबाहेर विनाकारण पडणाऱ्यांवर रबराच्या गोळ्या झाडण्यात येतात.
अफवा पसरवणाऱ्यांना ४५ हजारांचा दंड
पेरू देशात कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या हॉटलाईनवर खोटी माहिती देणाऱ्यांना ४५ हजारांच्या दंडांचे प्रावधान आहे. तर तामिळनाडूत अफवा पसरविणाऱ्या १२०० जणांना अटक करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त कोलंबियात आयडी क्रमांकानुसार घराबाहेर जाण्यास संमती आहे. ज्यांच्या आयडी क्रमांक ०, ४, ७ ने समाप्त होतो, अशा लोकांना सोमवारी घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.