तर 'एकटे' पडाल, पाक सरकारला प्रसार माध्यमांकडूनच चेतावणी
By admin | Published: October 17, 2016 02:31 PM2016-10-17T14:31:49+5:302016-10-17T14:31:49+5:30
पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याच्या दिशेने जवळ जात आहे, असा इशारा खुद्द पाकिस्तानी मीडियाने पाक सरकारला दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 17 - पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याच्या दिशेने जवळ जात आहे, असा इशारा खुद्द पाकिस्तानी मीडियाने पाक सरकारला दिला आहे. 'दहशतवाद्यांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने पाकिस्तान जागतिक पातळीवर एकटे पडण्याची शक्यता आहे', असे चेतावणी देणारी वृत्त पाकिस्तानी वृत्तपत्र 'द नेशन'ने छापले आहे. पाकिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना यासंदर्भातील इशारा देत, दोन आठवड्यांमध्ये दुस-यांदा या वृत्तपत्राने कठोर भूमिका मांडणार लेख छापला आहे.
'द नेशन' हे वृत्तपत्र पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघांच्याही जवळचे असल्याचे मानले जाते. यामुळे छापलेल्या लेखाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 'चीननेही दहशतवादाविरोधात कठोर भूमिका न मांडण्याबाबत पाकिस्तानकडे चिंता व्यक्त केली आहे', याची देखील वृत्तपत्राने आठवण करुन दिली आहे. तसेच, 'भेदभाव न करता दहशतवाद्यांविरोधात कारवाई केली पाहिजे', असेही 'द नेशन'च्या वृत्तात म्हटले गेले आहे. गोव्यातील ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचा उल्लेख 'दहशतवाद पोसणार देश' असा केला होता. याचा दाखला देत 'पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्यासाठी भारत कसून प्रयत्न करत आहे, हे मोदींच्या भाषणावरुन समोर येत', असेही देखील वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.
आणखी बातम्या
'सार्क परिषद रद्द करणे, पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी घालणे, यासारखे अनेक निर्णय घेत मोदी सरकार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला दुबळे करण्याचा प्रयत्न करत आहेत. जर आपण एकटे पडलो तर याचा परिणाम फार तीव्र असेल', असा इशाराही पाकिस्तान सरकारला लेखाद्वारे देण्यात आला आहे. 'पाकिस्तानला चांगले-वाईटमधील अजूनही फरक समजत नाही, असे म्हणत या लेखातून थेट पाकिस्तानचे सरकार आणि सुरक्षा यंत्रणांवर दहशतवादावरुन बोचरी टीका करण्यात आली आहे. 'काही दिवसांपूर्वी सत्ताधारी पक्षातील एका नेत्यानेही दहशतवादी समूहांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती',असेही या लेखात नमूद करण्यात आले आहे.
लेखामध्ये नमुद करण्यात आल्यानुसार, 'हे तेच दहशतवादी समूह आहेत, ज्यावर भारत पाकिस्तान 'दहशतवाद पुरस्कृत देश' असल्याचा आरोप करत आहे. त्यामुळे दहशतवाद्यांचा पूर्णपणे खात्मा करणे हेच देशाच्या हिताचे ठरेल', असा सल्लाही 'द नेशन' नवाज सरकारला दिला आहे. या लेखामध्ये 'डॉन' वृत्तपत्रातील सरकार आणि लष्करातील मतभेदासंदर्भातील बातमीचा उल्लेख करत सरकारचे कान टोचले आहेत. 'दहशतवादी समूहावर आपली बाजू मांडण्याऐवजी सरकारने बातमी छापणा-या पत्रकाराला देशाबाहेर जाण्यास बंदी घातली, या निर्णयामुळे सरकारची अपरिपक्वता समोर आली', अशी टीका देखील करण्यात आली आहे.
गोव्यातील ब्रिक्स शिखर परिषदेतही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे स्पष्टपणे नाव घेत दहशतवादाविरोधात कारवाई होत नसल्याने हल्लाबोल चढवला. याकडे लक्ष वेधत पाकिस्तानी वृत्तपत्र 'द नेशन'ने दहशतवाद्यांविरोधात कारवाई न केल्यामुळे जागतिक पातळीवर एकटे पडण्याचा इशारा पाकिस्तान सरकारला दिला आहे. दरम्यान, उरी दहशतवादी हल्ल्यात 20 भारतीय जवान शहीद झाले होते. याचा बदल घेण्यासाठी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. तसेच भारताने अद्दल घडवण्यासाठी पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटे पाडण्याचा निर्णय घेतला आहे.