पाकिस्तानने दहशतवादाची साथ सोडावी तर, संबंध सुधारतील - पंतप्रधान मोदी
By Admin | Published: June 3, 2016 09:05 AM2016-06-03T09:05:19+5:302016-06-03T09:05:19+5:30
पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडला तर, भारत-पाकिस्तान संबंध ख-या अर्थाने नवी उंची गाठतील असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले
>ऑनलाइन लोकमत -
पाकिस्तानने दहशतवादाचा मार्ग सोडला तर, भारत-पाकिस्तान संबंध ख-या अर्थाने नवी उंची गाठतील असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. भारत-पाकिस्तान संबंधांना नवा आयाम देण्यासाठी पाकिस्तानने स्वत:हून लादलेला दहशतवादाचा अडथळा दूर केला पाहिजे असे मोदी म्हणाले.
आम्ही पहिले पाऊल उचलण्यासाठी तयार आहोत. पण शांततेचा रस्ता दोन मार्गी असला पाहिजे असे वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत मोदींनी सांगितले. परस्परांबरोबर भांडण्यापेक्षा भारत-पाकिस्तानने एकत्र येऊन गरीबी विरोधात लढा दिला पाहिजे असे मोदी म्हणाले.
दहशतवादावर अजिबात तडजोड करणार नाही असे मोदींनी स्पष्ट केले. पाकिस्तान भारतावर दहशतवादी हल्ला करणा-या अतिरेक्यांवर ठोस कारवाई करत नसल्यामुळे संबंध सुधारणेला मर्यादा येतात असे मोदी म्हणाले. शांतता आणि शेजा-यांबरोबर चांगल्या संबंधांसाठी आपले सरकार स्थापनेच्या पहिल्यादिवसापासून प्रयत्नशील असल्याचे मोदींनी सांगितले.