शक्तीशाली देश असे करू लागले तर जग खतरनाक बनेल; निज्जरवरून ट्रुडो पुन्हा बरळले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 02:56 PM2023-11-12T14:56:46+5:302023-11-12T14:58:05+5:30
म्हणे कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश... निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय.
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येचे कॅनडाच्या पंतप्रधानांचे दु:ख अजून तरी संपलेले दिसत नाहीय. जस्टिन ट्रुडो यांनी पुन्हा एकदा भारतावर आरोप केले आहेत. एका पत्रकाराच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलेले आहे. यावेळी ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत जे आरोप भारतावर केलेले तेच पुन्हा केले आहेत.
निज्जर यांच्या हत्येच्या तपासात काय प्रगती आहे, प्रगती होत नसेल तर अमेरिकेने कॅनडाच्या बाजूने भारताबाबत कठोर भूमिका घ्यावी का? असा सवाल विचारण्यात आला होता. कॅनडाच्या भूमीवर कॅनडाच्या नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असल्याची विश्वासार्ह माहिती आम्हाला आधीच समजली होती. तेव्हा आम्ही भारताशी संपर्क साधला आणि त्यांना या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्यास सांगितले होते. सहकार्य करण्याची विनंती केली होती, असे ट्रुडो म्हणाले.
आम्ही आंतरराष्ट्रीय कायदा आणि कॅनडाच्या सार्वभौमत्वाच्या या गंभीर उल्लंघनावर कारवाई करण्यासाठी युनायटेड स्टेट्स आणि आमच्या इतर मित्र देशांशी संपर्क साधला. ही गोष्ट आम्ही खूप गांभीर्याने घेत आहोत, असे ट्रुडो म्हणाले. कॅनडा हा नेहमीच कायद्याचे पालन करणारा आणि त्यासाठी उभा राहणारा देश आहे. कारण सत्ता योग्य-अयोग्य ठरवू लागली, मोठ्या देशांनी परिणामांची चिंता न करता आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले, तर संपूर्ण जग सर्वांसाठीच अधिक धोकादायक होईल, असे ट्रुडो बरळले.
कॅनडाच्या भूमीवर एका कॅनेडियन नागरिकाच्या हत्येमध्ये भारत सरकारचे एजंट सामील असू शकतात असे मानण्याची आमच्याकडे गंभीर कारणे आहेत. यावर भारताची आलेली प्रतिक्रिया ही व्हिएन्ना कन्व्हेन्शनचे उल्लंघन करून कॅनेडियन अधिकाऱ्यांच्या मोठ्या समुहाला बाहेर काढणे ही होती. जेव्हा एखाद्या देशाला असे वाटते की आपले राजनैतिक अधिकारी दुसऱ्या देशात सुरक्षित नाहीत, तेव्हा ही परिस्थिती आंतरराष्ट्रीय संबंधांना अधिक धोकादायक आणि गंभीर बनवते, असे ट्रुडो म्हणाले.