अमेरिकेने आमच्या 52 ठिकाणांवर हल्ला केल्यास आम्ही त्यांची 140 ठिकाणे नष्ट करू; इराणचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 08:03 PM2020-01-08T20:03:53+5:302020-01-08T20:34:50+5:30
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
तेहरान - इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाला कधीही अधिकृतरीत्या तोंड फुटू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणने आगळीक केल्यास त्यांची 52 ठिकाणे उद्ध्वस्त केली जातील, असा इशारा दिला होता.आता अमेरिकेविरोधात आरपारच्या भूमिकेत पोहोचलेल्या इराणनेही अमेरिकेने हल्ला केल्यास अमेरिकेच्या 140 ठिकाणांना नष्ट करू, असा इशारा दिला आहे.
सुलेमानी यांच्या हत्या करण्यात आल्यानंतर त्यांच्य हत्येचा बदला घोषणा इराणकडून करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री इराण समर्थित मिलिशियाने इराकमधील अमेरिकन दुतावासासह अन्य काही अमेरिकन ठिकाण्यांवर रॉकेट आणि मोर्टारने हल्ले केले होते. तसेच शनिवारी सकाळी ईराणने जामकरन मशिदीवर लाल झेंडा फडकवून युद्धाचे संकेत दिले होते. इराणमधील महत्त्वाची 52 ठिकाणे निशाण्यावर असल्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला होता. दरम्यान, आता इराणकडून ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर देण्यात आले असून, अमेरिका आणि त्याच्या सहकारी देशांच्या 140 ठिकाणांना लक्ष्य केले जाईल, असा इशारा कुद्स फोर्सने दिला आहे. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांमधील 140 ठिकाणे निश्चित झाली असून, अमेरिकेकडून काही आगळीक झाल्याच अमेरिकेला त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल, असे इराणने म्हटले आहे.
इराणमधील सर्वोच्च नेते अयातुल्ला खामनेई यांच्या कार्यालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्यातरी अमेरिकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच्या पर्यायांपैकी सर्वात दुय्यम पर्याय म्हणून आम्ही क्षेपणास्त्रांची निवड केली आहे. अमेरिकेविरोधात इराण यापेक्षाही अधिक कठोर आणि प्रभावी पाऊल उचलू शकते.
दरम्यान, इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनीही अमेरिकेला कठोर शब्दात इशारा दिला आहे. "अमेरिकेने आमच्या लाडक्या सुलेमानीचा हात तोडला होता. त्यांच्या पार्थिवाजवळ पडलेला त्यांचा हात सर्वांनी व्हिडीओ आणि फोटोमधून पाहिला आहे. आता याचा बदला घेण्यासाठी आम्ही आखाती देशात अमेरिकेने रोवलेले पाय आम्ही तोडून टाकू. त्यांना येथून उखडून टाकू, अशी धमकी रुहानी यांनी दिली आहे.
दरम्यान, मंगळवारी संध्याकाळी सुलेमानी यांना 'सुपुर्द ए खाक' केल्यानंतर इराणने त्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अमेरिकेच्या इराकमधील तळांवर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार हल्ला केला होता. दरम्यान, अमेरिकेच्या तळांवर एकूण 22 क्षेपणास्त्रे डागण्यात आली. त्यात 80 अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा इराणने केला आहे.