Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2019 04:39 PM2019-02-24T16:39:45+5:302019-02-24T16:44:31+5:30
भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु....
अबुधाबीः वादग्रस्त आणि प्रक्षोभक विधानांसाठी ओळखले जाणारे पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी भारतावरील हल्ल्याबाबत अत्यंत विचारपूर्वक मत मांडत पाकमधील सत्ताधाऱ्यांना उपदेशाचा डोस पाजला आहे.
पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तनाबूत करून टाकेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणं अशक्य असल्याचं परवेझ मुशर्रफ यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, युद्धाचे ढग दाटले असताना, त्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जातंय. अबुधाबी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु, त्यांच्यात अणुहल्ला होणार नाही. आम्ही जर भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर २० अणुबॉम्ब टाकून ते प्रत्युत्तर देतील, आम्हाला संपवतील. ते जर नको असेल, तर भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?, असा प्रश्न करत त्यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळून लावली.
... त्यासाठी 'बॉर्डर'वर बोलावले 10 हजार सैनिक, 'अफवांवर विश्वास ठेवू नका' https://t.co/0U1tp08HqI
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 24, 2019
ऑल पाकिस्तान मुस्लीम लीगचे नेते असलेले मुशर्रफ सध्या विजनवासात आहेत. पाकिस्तानातील राजकीय वातावरण आपल्यासाठी फायदेशीर असल्याचं दिसू लागल्यानं, ते पाकला परतण्याचा विचार करत आहेत. पाकिस्तानमधील अर्धे मंत्री माझे आहेत, कायदा मंत्री आणि अॅटॉर्नी जनरल हे माझे वकील होते. हे वातावरण आपल्यासाठी चांगलं असल्याचं त्यांनी सूचित केलं.
१४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवानांना वीरमरण आलं होतं. जैश-ए-मोहम्मदनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या संघटनेला पाकिस्तान पोसत असल्यानं भारतात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. केंद्र सरकारनं लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आहे.
पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती; जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ https://t.co/OwBl35zRK2
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) February 22, 2019