चित्रपट पाहाल तर आई-वडील जाणार थेट तुरुंगात! किम जाँग उनचा अजब कायदा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:30 AM2023-03-02T08:30:14+5:302023-03-02T08:30:26+5:30
हॉलिवूड चित्रपट, मालिका बघणाऱ्या मुलांना ५ वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशी तरतूद उत्तर कोरियाने नव्या कायद्यात केली आहे.
प्योंगयांग : उत्तर कोरियामध्ये मुलांना हॉलिवूडसहित अन्य विदेशी चित्रपट किंवा मालिका बघण्यावर पूर्वीपासूनच बंदी आहे. मात्र आता बंदीहुकूम मोडणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना तुरुंगात धाडले जाईल, तसेच त्यांना ६ महिने मजूर छावणीत काम करावे लागणार आहे, असा नवा कायदा त्या देशाचा हुकूमशहा किम जाँग उन याने केला आहे.
हॉलिवूड चित्रपट, मालिका बघणाऱ्या मुलांना ५ वर्षांचा कारावास होऊ शकतो, अशी तरतूद उत्तर कोरियाने नव्या कायद्यात केली आहे. इतकेच नव्हे मुलांच्या आई-वडिलांनाही कठोर शिक्षा करण्याचा निर्णय घेऊन किम जाँग उन याने मुलांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. दक्षिण कोरियात नाटक, संगीत या गोष्टी विलक्षण लोकप्रिय आहेत. त्यामुळे उत्तर कोरियाने २०२० साली एक कायदा केला होता. त्यानुसार वैचारिक व सांस्कृतिक गोष्टींवर नियंत्रण राखण्यात आले. विदेशातील चित्रपट, मालिका, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध प्रकारची माहिती या गोष्टी नागरिकांनी पाहण्यावर उत्तर कोरियात या कायद्याद्वारे बंदी घालण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
‘मुले होतील भांडवलदारांची समर्थक’
n आपली मुले विविध माध्यमांत कोणते कार्यक्रम पाहतात यावर आई-वडिलांनी बारीक लक्ष ठेवले पाहिजे.
n पालकांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले नाहीत तर ते भविष्यात भांडवलदारांचे समर्थक व समाजवादी विचारसरणीचे विरोधक बनतील, असे किम जाँग उन याच्या सरकारने म्हटले आहे.
दोन मुलांना दिली होती देहदंडाची शिक्षा
दक्षिण कोरियातील पारंपरिक नृत्य, गाणी यांचे कार्यक्रम उत्तर कोरियातील मुलांनी पाहू नये, यासाठी किम जाँग उन सरकार अधिक सतर्क असते. उत्तर कोरियातील एका शाळेतील २ विद्यार्थ्यांना गेल्या ६ डिसेंबरला नागरिकांसमोर गोळ्या घालून देहदंडाची शिक्षा दिली. यांनी द. कोरियातील अनेक नाटकांचे व्हिडीओ मित्रांना पाठवले हा त्यांचा ‘गंभीर’ गुन्हा होता.