तुमच्या भेटीला कधीही येईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:41 AM2018-04-28T00:41:58+5:302018-04-28T00:41:58+5:30
किम जोंग ऊन; ६५ वर्षांचे वैर संपले, मैत्रीचा हात!
सोल (दक्षिण कोरिया) : ‘तुम्ही मला कधीही बोलवा, मी तुमच्या भेटीला येईन,’ असे कोरियाचे नेते किम जोंग ऊन यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांना शुक्रवारी म्हणाले. या दोन देशांच्या प्रमुखांची तब्बल ६५ वर्षांनी भेट झाली.
मध्यंतरी उत्तर कोरियात किम यांनी ज्या क्षेपणास्त्र चाचण्या केल्या, त्यामुळे सारे जग हादरून गेले होते. अमेरिकेने उत्तर कोरियावर निर्बंधही जाहीर केले होते. मात्र, चीनच्या मध्यस्थीनंतर किम यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आणि दक्षिण कोरियातही जाण्याचे ठरवले. अमेरिकेने या भेटीचे स्वागत केले असले तरी दोन देशांचे संबंध सुधारण्याचे सारे श्रेय चीनलाच दिले जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व किम जोंग ऊन यांच्यातील भेटीचा मार्ग त्यामुळे खुला होणार आहे.
कोरियन युद्धाचा१९५३ मध्ये शेवट झाल्यानंतर दक्षिण कोरियाला भेट दिलेले उत्तर कोरियाचे किम जोंग हे पहिले नेते ठरले. किम म्हणाले,‘सीमा काही फार उंच नाही. लोक जर ये-जा करीत राहिले तर तीही दिसेनाशी होईल.’ ‘आमची शिखर परिषद झाल्यावर आमच्या भेटी प्योंगगँग, सोल, जेजू बेट आणि पाएक्तू डोंगरात होतील अशी मला आशा आहे,’ असे मून म्हणाले.
उभय नेत्यांची भेट लष्कर नसलेल्या पॅनमुनजोम येथील पीस हाउसमध्ये झाली. याच भागाने दक्षिण व उत्तर कोरिया अशी विभागणी केलेली आहे.
‘ब्लू हाउसला तुम्ही आलात तर यापेक्षा अधिक चांगली दृश्ये दाखवीन,’ असे मून म्हणाल्यावर किम जोंग म्हणाले की, ‘तुम्ही मला बोलावल्यास मी कधीही ब्लू हाऊसला केव्हाही येईन.’ (वृत्तसंस्था)
ऐतिहासिक भेट
वॉशिंग्टन : उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन व दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जाए-इन यांच्यातील भेट ऐतिसासिक असून, ती कोरियन द्वीपकल्पासाठी प्रगती, शांतता व समृद्धीची ठरेल, अशी आशा अमेरिकेने व्यक्त केली.