पाकमधील नासधूस केलेल्या मंदिराची पुनर्रचना तातडीने करा- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 05:09 AM2021-02-10T05:09:49+5:302021-02-10T05:10:05+5:30
काम कधी पूर्ण करणार ते सांगण्याचाही आदेश
इस्लामाबाद : शंभर वर्षांपेक्षा जास्त जुन्या असलेल्या हिंदू मंदिराची तातडीने पुनर्रचना करण्यास आणि ती किती मुदतीत पूर्ण करणार हे कळवण्यास पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने खैबर पख्तुनख्वॉ सरकारला आदेश दिला. या मंदिराची जमावाने नासधूस केलेली आहे. खैबर पख्तुनख्वॉतील कारक जिल्ह्याच्या टेरी खेड्यात मूलतत्त्ववादी जमिएत उलेमा-ए-इस्लाम पक्षाच्या (फाझल उर रेहमान गट) सदस्यांनी गेल्या डिसेंबरमध्ये या मंदिरावर हल्ला केला होता. मानवी हक्क कार्यकर्ते आणि अल्पसंख्य हिंदू समाजाच्या नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात मंदिराच्या पुनर्रचनेचे आदेश दिले. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती गुलझार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने मंदिर जाळल्या गेल्या प्रकरणाची दखल घेतली.
न्यायमूर्ती गुलझार म्हणाले की,‘मंदिर प्रकरणी कोणाला अटक झाली का, याची माहिती आम्हाला द्या.’ इव्हाकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डचे वकील इक्राम चौधरी यांनी मंदिर प्रकरणी आतापर्यंत काहीही वसुली झालेली नाही, असे न्यायालयाला सांगितले. ज्या लोकांनी मंदिर जाळले त्यांच्याकडून त्याच्या बांधकामाचे पैसे वसूल करा, असा आदेश प्रांतीय सरकारला गेल्या जानेवारी महिन्यात न्यायालयाने दिला होता.
सरकारने मंदिर पुनर्रचनेसाठी ३०.४१ दशलक्ष रुपये मंजूर केल्याची माहिती न्यायालयाला दिली गेली. न्यायमूर्ती इझाझुल अहसान म्हणाले की, ‘ज्यांनी मंदिर जाळले त्यांच्याकडून पैसे वसूल करा म्हणजे त्यांना धडा मिळेल, असा आदेश न्यायालयाने दिला होता.’ फाळणीनंतर जे हिंदू व शीख भारतात गेले त्यांच्या धार्मिक स्थळांची व मालमत्तांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी इव्हाकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डकडे आहे.
हिंदू कौन्सिलचे प्रमुख आणि नॅशनल असेम्ब्लीचे सदस्य रमेश कुमार यांनी सांगितले की, ‘मुख्यमंत्री महमूद खान म्हणाले की, कारक भाग हा संवेदनशील असून तेथे मंदिराची पुनर्रचना ही हिंदू समाजाने केली पाहिजे.’