मॅसिडोनियावर स्थलांतरितांचा ताण
By admin | Published: August 23, 2015 11:37 PM2015-08-23T23:37:44+5:302015-08-23T23:37:44+5:30
सीरिया आणि इतर अनेक देशांमधून युरोपमध्ये घुसलेल्या स्थलांतरितांनी आता ग्रीस संपुर्ण देश पादाक्रांत करुन पुढे जाण्यास प्रारंभ केला आहे. सीरियन
स्कोजे : सीरिया आणि इतर अनेक देशांमधून युरोपमध्ये घुसलेल्या स्थलांतरितांनी आता ग्रीस संपुर्ण देश पादाक्रांत करुन पुढे जाण्यास प्रारंभ केला आहे. सीरियन स्थलांतरितांनी आता बाल्कन देशांमध्ये प्रवेश करण्याचा आटापिटा गेल्या दोन दिवसांमध्ये लावला आहे. ग्रीस पार करुन मॅसिडोनियामध्ये आता हे लोक पोडोचले आहेत. मात्र स्थलांतरितांच्या प्रश्नासाठी कोणतीच तयारी नसलेल्या मॅसिडोनियाची मात्र यामुळे चांगलीच भंबेरी उडाली. दररोज दोन हजार अशा गतीने स्थलांतरांचा लोंढा येऊ लागल्यावर मॅसिडोनियाने आणीबाणी परिस्थितीची घोषणा केली आहे.
शुक्रवारपासून स्थलांतरित आणि मॅसिडोनियन पोलीस, लष्कराचे जवान यांच्यामध्ये नो मॅम्स लँडमध्ये धुमश्चक्री सुरु आहे. लहान मुले, महिला यांच्यासह घुसणाऱ्या या लोकांवर स्टन ग्रेनेड आणि अश्रूधुराचा वापरही पोलिसांनी करुन पाहिला पण तरिही त्यातूनही वाटा काढून स्थलांतरित घुसखोरी करतच आहेत. पावसाची रिपरिप, पिण्याचे पाणी व अन्नाचा तुटवडा असूनही चिखलात राहून सीरियन लोक मॅसिडोनियात घुसायची संधी शोधत आहे.
मॅसिडोनियावर मात्र या अचानक आलेल्या प्रश्नाचा चांगलाच ताण आला आहे, त्यामुळे आणीबाणी घोषित करुन सरकारने लष्कराला पाचारण करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅसिडोनियन सरकारने या सर्व गोंधळाच्या प्रश्नाचे खापर ग्रीसवर फोडले असून, ग्रीसने वेळीच लक्ष न दिल्यामुळे हे स्थलांतरित पुढे सरकले असा आरोप त्यांनी केला आहे.
1999 ची स्थिती कोसोवो हा तत्कालिन सर्बियाचा प्रांत असताना जी युद्धमय परिस्थिती झाली होती त्यावेळेस अल्बानियन वंशाच्या लोकांनी मॅसिडोनियाच्या उत्तर भागामध्ये आश्रय घेतला होता. तशीच काहीशी स्थिती आता या देशावर पुन्हा आली आहे मात्र या प्रश्नाचे गांभिर्य जास्त आहे हे निश्चित.
आम्ही दहशतवादी नाही !
मॅसिडोनियन सरकारने प्रतिकाराची भूमिका घेतल्यामुळे स्थलांतरितांची अगदीच ना घरका ना घाटका अशी स्थिती झाली आहे. आम्ही दहशतवादी नाही, आम्ही माणसेच आहोत अशी विनवणी हे सीरियन लोक करत आहेत. तर सीरियन लोकांमध्ये पाकिस्तानी, अफगाणी लोक घुसल्यामुळे स्थलांतरितांमध्येही गट पडले आहेत व वेगवेगळे राहून मॅसिडोनियात प्रवेश करण्याची धडपड ते करत आहेत. अपंग, गर्भवतींचाही समावेश या स्थलांतरितांच्या लोंढ्यामध्ये आहे.