थायलंडमध्ये आणीबाणी, मार्शल लॉ लागू
By admin | Published: May 20, 2014 10:50 AM2014-05-20T10:50:52+5:302014-05-20T10:52:17+5:30
सरकारविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून विरोध प्रदर्शन सुरुच असल्याने थायलंडमध्ये मंगळवारपासून मार्शल लॉ लागू करण्यात आल्याची घोषणा थायलंडच्या लष्करप्रमुखांनी केली आहे.
Next
>ऑनलाइन टीम
बँकॉक, दि. २० - सरकारविरोधात गेल्या सहा महिन्यांपासून विरोध प्रदर्शन सुरुच असल्याने थायलंडमध्ये मंगळवारपासून मार्शल लॉ लागू करण्यात आल्याची घोषणा थायलंडच्या लष्करप्रमुखांनी केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे लष्करी अधिका-यांनी सांगितले आहे.
थायलंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांच्याविरोधात देशात संतप्त वातावरण आहे. भ्रष्टाचार तसेच पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरुन शिनवात्रा यांना पंतप्रधानपद सोडावे लागले आहे. मात्र त्यांच्याऐवजी आता पंतप्रधानपदी निवडून न आलेल्या नेत्याची वर्णी लावण्यात आली आहे. याविरोधात पीपल्स डेमोक्रेटीक रिफॉर्म कमिटीने तीव्र आंदोलन छेडले आहे. यामुळे थायलंडमधील सत्तासंघर्ष तीव्र रुप धारण करत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री उशीरा थायलंडच्या लष्करप्रमुखांनी देशात मार्शल लॉ लागू करत असल्याची घोषणा केली. सर्व पक्ष व सर्व समुहांना सुरक्षा पुरवून देशात शांतता प्रस्थापित करणे हाच आमदा उद्देश असल्याचे लष्करप्रमुख प्रूथ चान ओचा यांनी म्हटले आहे. मार्शल लॉ लागू झाल्याने देशातील जनतेने घाबरुन जाऊ नये. ते त्यांचे काम आधीप्रमाणेच करु शकतील असे त्यांनी स्पष्ट केले. देशात सत्ताबदल करण्यासाठी आम्ही मार्शल लॉ लागू केलेला नाही असे ओचा यांनी निवेदनात नमूद केले आहे. मार्शल लॉ लागू झाल्याने देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे.