ट्रम्पविरोधात महाभियोगाची तयारी
By admin | Published: June 9, 2017 03:45 AM2017-06-09T03:45:18+5:302017-06-09T03:45:18+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी सुरू केली
वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड होऊन सहा महिने होत नाहीत तोच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग आणण्याची तयारी अमेरिकी काँग्रेसमधील डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी सुरू केली आहे. ‘फेडरल ब्युरो आॅफ इन्व्हेस्टिगेशन’च्या (एफबीआय) संचालकपदावरून जेम्स कॉमी यांची हकालपट्टी करण्याची ट्रम्प यांची कारवाई हा न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप असल्याच्या मुद्द्यावरून हा महाभियोग आणण्याचा विचार आहे.
ट्रम्प यांच्यावर महाभियोग चालवायला हवा, अशी मागणी गेल्या महिन्यात प्रतिनिधी सभेत करणारे टेक्सास राज्याचे डेमोक्रॅटिक प्रतिनिधी अल ग्रीन यांना कॅलिफोर्नियातील प्रतिनिधी ब्रॅड शेरमन यांची साथ मिळाली आहे. ते काँग्रेसमध्ये महाभियोग आणण्याची पावले टाकतील, अशी अपेक्षा आहे.
ही दीर्घ प्रक्रियेची सुरुवात आहे, असे स्पष्ट करून अल ग्रीन म्हणाले की, ज्यांना माहीत नाही, त्यांच्यासाठी हे सांगावेसे वाटते की, महाभियोग आणल्याने राष्ट्राध्यक्ष दोषी ठरतीलच असे नाही. प्रतिनिधी सभा राष्ट्राध्यक्षांविरुद्ध आरोप ठेवेल. अगदी तंतोतंत तसे नसले तरी फौजदारी खटल्यात आरोप निश्चित करण्यासारखेच हे आहे.
महाभियोगाची मागणी केल्यानंतर आपल्याला धमकीचे फोन आणि संदेश आले, असाही आरोप त्यांनी केला असून कॅपिटॉल हिल पोलीस त्याचा तपास करीत अहेत. मात्र डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे असे आहे की, सदस्यांनी घाई करू नये. कॉमी यांना पदावरून दूर केले जाण्याच्या संदर्भात सुरू असलेला तपास पूर्ण होऊ दिला जावा, जेणेकरून त्यातून ट्रम्प व त्यांच्या सहकाऱ्यांच्या विरोधात अधिक माहिती हाती येऊ शकेल. राष्ट्राध्यक्षांनी न्यायप्रक्रियेत अडथळा आणला असे सिद्ध झाल्यास तो महाभियोगासाठी प्रबळ विषय होऊ शकतो. प्रत्यक्षात त्या दिशेने पाऊल टाकण्यापूर्वी ते थोडे सबुरीने घेऊ इच्छितात.
मात्र महाभियोग प्रस्तावाची कोणतीही औपचारिक नोटीस ग्रीन यांनी अद्याप प्रतिनिधी सभेतील बहुमताच्या नेत्या नॅन्सी पॉवेल किंवा इतरांना दिलेली नाही. (वृत्तसंस्था)
>काहीही फरक नाही
ट्रम्प यांना महाभियोगास सामोरे जायलाच हवे ही भूमिका
ठामपणे मांडताना ग्रीन म्हणाले की, कोणताही विधिनिषेध न बाळगता राष्ट्राध्यक्ष न्यायप्रक्रियेत खोडा घालू शकतात का, हा खरा प्रश्न आहे. ग्रीन म्हणाले की, कॉमी यांनी काहीही जबानी दिली तरी ट्रम्प यांची कृती न्यायप्रक्रियेतील अडथळाच आहे. तपासातून काहीही निष्पन्न झाले तरी यात काहीही फरक पडणार नाही.