चुकीचा आहार व जीवनशैली ही आजाराची दाेन कारणे; हाँगकाँगमध्ये ६ व्या आयुर्वेद दिनाचे आयाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2021 12:21 PM2021-11-07T12:21:02+5:302021-11-07T12:25:01+5:30
नावेदा वेलनेसतर्फे हाँगकाँगमध्ये ६ व्या आयुर्वेद दिनाचे आयाेजन
हाँगकाँग : ६ व्या आयुर्वेद दिनाचे औचित्य साधून भारतीय वाणिज्य दूतावास, हाँगकाँगतर्फे नावेदा वेलनेस अँड इन्स्टिट्यूट ऑफ लर्निंग ॲण्ड डेव्हलपमेंटच्या सहकार्याने हाँगकाँगच्या इंडिया क्लब येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोकमत समूह या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर होते. या वर्षी ‘पाेषण’ ही आयुर्वेद दिनाची संकल्पना हाेती.
कार्यक्रमाची संकल्पना आणि सामग्री डॉ. संजय नगरकर आणि प्रा. रिता व्यास-नगरकर यांनी तयार केली. कार्यक्रमाला हाँगकाँग येथील भारतीय वाणिज्य दूत प्रियंका चाैहान यांच्यासह सल्लागार प्रियंका मेथानी तसेच वैज्ञानिक डाॅ. संजय नगरकर, प्रा. रिता व्यास-नगरकर, वीणा दानसिंघानी, लाल दर्यानानी, आयुर्वेद तज्ज्ञ तसेच या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित हाेते. हा कार्यक्रम भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राष्ट्रगीताने झाली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजन करण्यात आले.
काैन्सुल जनरल प्रियंका चाैहान म्हणाल्या, धन्वंतरी जयंतीच्या दिवशी आयाेजित हा समाराेह विशेष आहे. आयुर्वेद दिनासाेबतच भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन म्हणजे स्वातंत्र्याचा अमृत महाेत्सव साजरा केला जात आहे. भारत देश विश्वगुरू आहे, हे सत्य आहे. आयुर्वेद ही पारंपरिक औषधांची सर्वात प्राचीन वैज्ञानिक उपचार पद्धती आणि जीवन प्रणाली आहे, ज्यातून कल्याण आणि समग्र उपचार साधणे शक्य आहे.
पाेषण संकल्पनेअंतर्गत आराेग्यदायी आहाराचे महत्त्व सांगताना विनाेद शर्मा म्हणाले, मानवी शरीरात वात, पित्त व कफ असे तीन दाेष असतात व पाेषक घटक त्यांना नियंत्रित करतात. प्रत्येक देशाचे एक संविधान असते, त्याचप्रमाणे आपल्या शरीर आणि मेंदूचे स्वत:चे संविधान असते. चुकीचा आहार व जीवनशैली या दाेन गाेष्टी आजाराचे कारण असल्याचे ते म्हणाले. स्मिता मुरे यांनी तमस, राजस व सात्त्विक या तीन गुणांवर मार्गदर्शन करताना अन्नाचे आपल्या मानसिक आराेग्यावर हाेणारे परिणाम अधाेरेखित केले. सात्त्विक आहार हा सर्वात शुद्ध आहार आहे जो मनाला शांत, तंदुरुस्त आणि नेहमी शांततेत राहण्यास मदत करत असल्याचे त्यांनी सांगितले.
याेग गुरू विष्णू कुमार यांनी आयुर्वेदामध्ये नमूद याेग्य आहाराचे नियाेजन करून याेगाच्या मदतीने शरीरातील दाेषांवर कसे नियंत्रण मिळवता येते, याबाबत मार्गदर्शन केले. डाॅ. श्वेता छाेकर यांनी गुणवत्तापूर्ण आयुर्वेद डाॅक्टर कसे व्हावे याबाबत मार्गदर्शन केले. आयुर्वेदातील तज्ज्ञ डॉक्टर व औषध तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय मान्यता मिळविण्यासाठी सहा वर्षे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हाँगकाँगमधील वैज्ञानिक डाॅ. संजय नगरकर यांनी भारतीय औषधी वनस्पती व मसाल्यांच्या क्षेत्रात हाेणाऱ्या वैज्ञानिक विकासाची माहिती दिली.
आधुनिक विज्ञान आपल्याला भारतीय औषधी वनस्पती आणि मसाल्यांचे उपचारात्मक गुणधर्म समजून घेण्यास परवानगी देते. त्यामुळे आयुर्वेदिक चिकित्सकांनी त्यांच्या अभ्यासामध्ये याबाबतची वैज्ञानिक माहिती समाविष्ट केली पाहिजे. त्यांनी अन्न सुरक्षा ऑडिटिंगच्या महत्त्वावर भर दिला आणि पोषणाशी संबंधित संज्ञा समजून घेणे का महत्त्वाचे आहे, याविषयी माहिती दिली. त्यांनी वाल्मीकी रामायण, द्वारका आणि रामसेतूच्या पुरातत्त्व अभ्यासातील उदाहरणे देत यामधील दाव्यांना वैज्ञानिक मान्यता देणे हा मुख्य संदेश असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.