इम्रान सरकार बॅकफूटवर, पाकिस्तानमध्ये दोन गटांतील हिंसाचारात 11 ठार 15 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 07:27 PM2021-10-26T19:27:06+5:302021-10-26T19:28:48+5:30
आत्तापर्यंत दोन्ही गटांकडून झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत. या लढाईत शस्त्रांस्त्रांचा वापर करण्यात आला असून सोमवारपासून हा हिंसाचार सुरू आहे
इस्लामाबाद - उत्तर पश्चिमी पाकिस्तानच्या कबायली परिसराती वन परिक्षेत्राच्या जागेवरुन झालेल्या वादातून दोन गटांत हिंसाचार उफाळला. कुर्रम जिल्ह्यातील कोहाट डिव्हीजनमध्ये शिया आणि सुन्नी यांच्यात झालेल्या हिंसाचारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी झाले आहेत. एनआयएच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगल परिक्षेत्रातील झाडांची कत्तल करण्यावरुन दोन गटांत हा वाद निर्माण झाला होता.
आत्तापर्यंत दोन्ही गटांकडून झालेल्या गोळीबारात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जण जखमी आहेत. या लढाईत शस्त्रांस्त्रांचा वापर करण्यात आला असून सोमवारपासून हा हिंसाचार सुरू आहे. संबंधित परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. पाकिस्तानात सांप्रदायिक वाद वाढत चालला असून शिया आणि सुन्नी या दोन गटांत हिंसाचाराच्या घटना घडतात. अल-कायदा आणि तहरीत ए-तालिबान पाकिस्तानातील सशस्त्र सुन्नी गट सातत्याने शिया समुदायांच्या सभांना टार्गेट करते. देशातील मुस्लीम लोकसंख्येच्या 20 टक्के लोकसंख्या शिया समुदायाची आहे.
दुसरीकडे कट्टरपंथी इस्लामी समुहासमोर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हात टेकले आहेत. कट्टरपंथी इस्लामी समुदाय तहरीक ए-लब्बैक पाकिस्तानने इशारा दिला होती की, त्यांचे कार्यकर्ते मंगळवार सायंकाळपर्यंत इस्लामाबादकडे जाणार आहेत. त्यामुळेच, तहरकी ए-लब्बैकच्या दबावामुळेच पाकिस्तान सरकारने 350 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची सुटका केली. दरम्यान, इतर कार्यकर्त्यांवर करण्यात आलेले खटलेही बुधवारपर्यंत वापस घेणार असल्याची घोषणा टीएलपीने केली आहे.