पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान एक वर्षांपासून कैदेत; तुरुंगात हलायलाही नाही जागा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2024 09:01 AM2024-11-02T09:01:53+5:302024-11-02T09:06:05+5:30
अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवता न आल्यानं इमरान यांच्या पक्षाच्या बहुतांश उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय इमरान यांना विविध आरोपांवरून तुरुंगात डांबण्यात आलं आहे.
पाकिस्तान हा असा देश आहे, जिथे कधीच शांतता नांदली नाही. म्हणायला लोकशाही देश; पण इथे कायम लष्कराचंच वर्चस्व राहिलं. लोकशाही सरकार सत्तेवर आलं तरी लष्कराचा वरचष्मा तिथे कायमच राहिला. आजही तिथे तेच पाहायला मिळतंय. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खानदेखील एक वर्षापासून पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. त्यांचं तर दुर्दैव असं की फेब्रुवारी २०२४ मध्ये पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळूनही ना त्यांचं सरकार सत्तेवर आलं, ना त्यांच्या पक्षाला कुठली ‘मान्यता’ मिळाली. या निवडणुकीत इमरान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्सान या पक्षाला ३४२ पैकी ९३ जागा मिळाल्या. नवाज शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग-एन या पक्षाला ७५ जागा मिळाल्या, पाकिस्तान पीपल्स पार्टीला ५४ जागा, तर इतर पक्ष मिळून ४३ जागा आल्या. मात्र तरीही पाकिस्तानच्या सत्तेत इमरान यांच्या पक्षाचा कुठलाही वाटा नाही. कारण या निवडणुकीत त्यांच्या पक्षाचं निवडणूक चिन्हच गोठवण्यात आलं होतं.
अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवता न आल्यानं इमरान यांच्या पक्षाच्या बहुतांश उमेदवारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. याशिवाय इमरान यांना विविध आरोपांवरून तुरुंगात डांबण्यात आलं आहे. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल असावेत? तब्बल शंभरपेक्षा जास्त गुन्हे त्यांच्या नावावर आहेत. त्यातले तीन प्रमुख गुन्ह्यांमध्ये पहिला गुन्हा म्हणजे तोशाखाना केस. पंतप्रधान असताना त्यांना विविध देशांकडून किंवा विविध देशांच्या नेत्यांकडून जी गिफ्ट्स मिळाली, ती परस्पर मार्केटमध्ये विकल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ही सर्व गिफ्ट्स सरकारी मानली जातात. या गुन्ह्यात त्यांना १४ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यांच्यावरचा दुसरा मोठा आरोप आहे तो म्हणजे सरकारी दस्तऐवजांची चोरी करणं. या गुन्ह्यात त्यांना दहा वर्षांची शिक्षा झाली होती. याशिवाय त्यांच्यावर दाखल झालेला तिसरा मोठा गुन्हा होता पत्नी बुशरा बिबी यांच्यासोबत बेकायदेशीर विवाह केल्याचा.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तिन्ही गुन्ह्यांत त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. मात्र इमरान तुरुंगातून बाहेर आल्यास सरकारसाठी ते अडचणीचं ठरू शकेल आणि ते पुन्हा फेरनिवडणुकीची मागणी करतील, या भीतीनं त्यांना तुरुगांतून बाहेरच पडू द्यायचा नाही, असा डाव आहे. एकामागोमाग एक कुठल्यातरी गुन्ह्यात त्यांना अडकावायचं आणि त्यांना पुन्हा तुरुंगात डांबायचं असा सिलसिला सुरू आहे.
तुरुंगातही इमरान यांचे हालच आहेत. अर्थात तिथूनही आपल्या परीनं विरोध करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. तुरुंगात इमरान यांना ज्या खोलीत ठेवण्यात आलं आहे, ती खोली सात बाय आठ फुटांची आहे. इमरान यांची उंची सहा फूट दोन इंच आहे. एवढ्या छोट्या जागेत आपल्याला बंदिस्त केलं आहे की त्यामुळे इथे आपल्याला अक्षरश: हलता-डुलताही येत नाही अशी इमरान यांची तक्रार आहे.
‘मी २४ तास गुप्तचर यंत्रणांच्या पहाऱ्यात असतो, इतकंच काय, मला कोणालाच भेटू दिलं जात नाही, एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे मला तुरुंगात डांबून ठेवण्यात आलं असून, तुरुंगातच मला मारून टाकण्याचा सरकारचा डाव आहे’, असं इमरान यांचं म्हणणं आहे. त्याचवेळी पाकिस्तानचे सूचनामंत्री अताउल्लाह तरार यांचं म्हणणं आहे, तुरुंगात असूनही इमरान राजेशाही थाटात राहताहेत. त्यांना तुरुंगातच व्यायामाची एक उत्तम सायकल, एक वर्किंग गॅलरी आणि एक किचन देण्यात आलं आहे. खाण्यासाठी त्यांना रोज अतिशय शानदार मेन्यू दिला जातो. तुरुंगात असणाऱ्या माणसाला यापेक्षा अधिक काय हवं?..
इस्लामाबादच्या स्थानिक कोर्टानं इमरान यांना ५ ऑगस्ट २०२३ रोजी तोशाखाना केसमध्ये दोषी ठरवलं होतं. त्यानंतर इस्लामाबाद येथील जमान पार्कस्थित त्यांच्या घरातून त्यांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी दैनिक ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार इमरान जर तुरुंगातून बाहेर आले, तर ते पुन्हा निवडणुकीची मागणी करतील आणि पाकिस्तानात रान पेटवतील. जनमत अजूनही बऱ्यापैकी त्यांच्या बाजूनं आहे. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांना तुरुंगातच सडवलं जात आहे. पाकिस्तानात ८ फेब्रुवारी २०२४ रोजी झालेली निवडणूक बेकायदेशीर असल्याचं इमरान यांचं म्हणणं आहे.
‘मसिहा’च आमची सुटका करील!
आपल्याला तुरुंगात डांबण्यात आलं असलं तरी एक ना एक दिवस सत्याचा विजय होईल आणि माझी तुरुंगातून सुटका होईल, यावर इमरान यांचा प्रचंड भरवसा आहे. पाकिस्तान सध्या सर्वच क्षेत्रांत माघारलेला असल्यानं आणि आर्थिक विवंचनांनी त्यांचं कंबरडं पार मोडलेलं असताना, कोणीतरी मसिहा येईल आणि आपली यातून सुटका करील, अशी त्यांची अपेक्षा आहे; पण सध्या तरी त्यांच्यासाठी असा कोणीही मसिहा नाही.