Imran Khan Address to Nation: 'नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी यांच्यात गुप्तभेट', इम्रान खान यांचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 09:45 PM2022-03-31T21:45:25+5:302022-03-31T21:58:12+5:30
Imran Khan Address to Nation: ''येत्या रविवारी देशाचा निर्णय होईल, हा देश कोणत्या मार्गाने जाणार हे ठरवले जाईल. पण मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन. रविवारी निकाल काहीही येवो, मी पुन्हा नव्याने उभा राहून तुमच्यासमोर येईन.''
इस्लामाबाद:पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानसाठी उलटी गिनती सुरू झाली आहे. आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्यापूर्वीच संसदेचे कामकाज 3 एप्रिलपर्यंत तहकूब करण्यात आले. दरम्यान, इम्रान खान सातत्याने देशात आपल्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज इम्रान खान यांनी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाला अस्थिर करण्यात अमेरिकेचा हात असल्याचा आरोप केला. तसेच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत मोठा खुलासा केला.
'देशासाठी काम करायचे आहे'
आपल्या संबोधनात इम्रान खान म्हणाले की, ''मी राज्यशास्त्राचा विद्यार्थी होतो, म्हणून राजकारणात आलो. पाकिस्तानसाठी हा मोठा निर्णय घेण्याची वेळ आहे. इस्लामिक राज्य निर्माण करण्याचा आमचा उद्देश होता. न्याय याला माझ्या जाहीरनाम्यात सर्वोच्च स्थान होते. माझ्यासाठी न्याय आवश्यक नसता तर मी राजकारणात आलो नसतो. आज माझ्याकडे सर्वकाही आहे, यापूर्हीपण होते. मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे. सुरुवातीला लोक माझ्यावर हसायचे, राजकारणात कशाला आलात, म्हणायचे. पण, मला देशासाठी काहीतरी करायचे होते, त्यामुळेच मी राजकारणात आलो.''
'नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ यांच्यात गुप्त भेट'
ते पुढे म्हणाले की, ''बरखा दत्त यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवले आहे की, नेपाळमध्ये नवाझ शरीफ भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुपचुप भेटायचे. लष्कराने कारवाई करू नये म्हणून मोदींसोबत बोलणी करायचे. आज तेच लोक मला काढून सत्तेत येण्याचा विचार करत आहेत. त्यांना फक्त सत्ता हवी आहे, त्यांच्या मनात देशाबद्दल कुठलीही भावना नाही. येत्या रविवारी देशाचा निर्णय होईल. हा देश कोणत्या मार्गाने जाणार हे ठरवले जाईल. पण मी शेवटच्या चेंडूपर्यंत लढत राहीन. रविवारी निकाल काहीही येवो, मी पुन्हा नव्याने उभा राहून तुमच्यासमोर येईन.''
'या कारस्थानात अमेरिकेचा हात'
ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानात आमची सत्ता असेल, तर सर्व संबंध तोडण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे. आमची सत्ता घालवण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत, पाकिस्तानला अस्थिर करण्यासाठी ज्या कारवाया सुरू आहेत, त्यामागे अमेरिकेचा हात आहे. पण मी राजीनामा देणार नाही, शेवटपर्यंत लढत राहीन. या रविवारी पाकिस्तान कोणत्या बाजूला असेल याचा निर्णय होणार आहे. रविवारी प्रत्येक गद्दाराचा चेहरा जनता लक्षात ठेवेल'', असेही इम्रान खान म्हणाले.