'इम्रान खान लष्कराचा बाहुलाच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:01 AM2018-07-28T04:01:34+5:302018-07-28T04:01:52+5:30
ज्येष्ठ लष्करी तज्ज्ञांचे मत
पुणे : क्रिकेटपटू इम्रान खान पंतप्रधान झाला असला तरी लष्कराचा बाहुलाच राहणार आहे. निवडणूक निकालानंतर त्याने केलेली विधानेही गंभीर आहेत. त्यामुळे भारताने सतर्क राहण्याची गरज ज्येष्ठ लष्करी अधिकारी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर म्हणाले, भारतात इम्रान खानची ओळख एक क्रिकेटपटू अशी आहे. पूर्वीचा इम्रान खान आणि आताचा इम्रान खान यात मोठी तफावत आहे. निवडणुकीचे निकाल येतानाच नरेंद्र मोदी माझ्या यशाला पाहून घाबरतील, काश्मीरचा प्रश्न हा आमचा प्रश्न आहे, अमेरिकेने पाकिस्तानवर अन्याय केला आहे. पाकिस्तानला याची दखल घ्यावी लागेल, अशी विधाने केली. या तिन्ही विधानांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. इम्रान खान हा स्वबळावर पंतप्रधान होऊ शकत नाही. पाकिस्तानी सैन्याने यापुढे लष्कर सत्ता घेणार नाही, असे जाहीर केले आहे. इम्रान खानला पुढे आणण्यात पाकिस्तानी सैन्याचा हात असून, लष्कराचे बाहुले बनून तो काम करणार आहे.
पाकिस्तानी लष्कराचे सरकारवर अप्रत्यक्षरीत्या नियंत्रण राहणार असल्याने भारताला सतर्क राहण्याची गरज आहे. चीनने पाकिस्तानला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. इम्रान खान हा पाकिस्तानच्या पश्तून प्रांतातील आहे. पश्तून प्रांतातील मुसलमानांचे पंजाब प्रांतातील मुसलमानांशी चांगले संबंध नाही. काश्मीरच्या बाबतीत त्याने केलेले विधान गंभीर आहे. पाकिस्तानच्या कुठल्याही प्रश्नाचा थेट भारतावर परिणाम होत असल्याने आपण बेसावध न राहता सावध राहणे ही काळाची गरज आहे.
- दत्तात्रय शेकटकर,
निवृत्त लेफ्टनंट जनरल
लोकशाही पद्धतीने निवडणुका जिंकून इम्रान खानची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे. यामुळे भारताने पाकिस्तानसोबत चर्चा केल्यास यातून चांगले मार्ग निघेल. जर ही संधी गमावली तर इम्रान खान आणि त्याचे सहकारी हे चीनच्या अधिक जवळ जाण्याची शक्यता आहे. यापूर्वीच्या सरकारने चीनशी सर्वाधिक जवळीक केली होती. यापुढेही लष्करी आणि आर्थिक सहकार्य वाढल्यास भारतासाठी ती डोकेदुखी ठरेल. यामुळे भारताकडे ही एक संधी आहे. इम्रान खानचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन फारसा समाधानकारक नसला तरी चर्चेचा प्रस्ताव आल्यास भारताने दोन पावले पुढे जायला हवे. सध्याची पाकिस्तानची स्थिती पाहता भारताबरोबर शांततापूर्ण संबंधाची गरज त्यांना आहे.
- डॉ. विजय खरे,
विभागप्रमुख, संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग.
पाकिस्तानमध्ये इम्रान खान हे निवडून जरी आले असले तरी खरी सत्ता ही लष्कराच्याच हाती राहणार आहे. खरी सत्ता ही सैन्याकडेच असते. या वेळेला इम्रान खान हा चेहरा असून सैन्याने त्याला निवडून आणण्यास मदत केली आहे. यामुळे सत्ता ही सैन्याच्या हातातच राहणार आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या संबंधात फारशी सुधारणा होणार नाही. पाकिस्तान दहशतवादाचा वापर करून काश्मीर खोऱ्याचा हिंसाचार करतात. याद्वारे हा मुद्दा आंतराष्ट्रीय स्तरावर पेटता ठेवला जात आहे. कारण पारंपरिक युद्धात पाकिस्तान भारताशी जिंकू शकत नाही. यामुळे भारतात दहशतवादी पाठवून पाकिस्तान कुरापती करत राहणार. सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती आणि अंतर्गत सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी दहशतवादी हल्ल्यामुळे जवळपास ५ हजार नागरिकांचा पाकिस्तानात मृत्यू होतो. हा दहशतवाद कमी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्य व्यस्त आहे. याबरोबरच पाकिस्तानची आर्थिक अवस्था बिकट आहे. कुणी कर्ज देण्यास त्यांना तयार नाही. फक्त चीन हा पाकिस्तानला मदत करू शकतो. पण ती कर्ज स्वरूपात असल्यामुळे ती पाकिस्तानला परवडणारी नाही. अशा परिस्थितीत इम्रान खान सत्तेत आले तरी फारसा परिणाम होणार नाही.
- हेमंत महाजन, निवृत्त ब्रिगेडिअर