Imran Khan: इम्रान खान यांच्या हत्येचा कट, सुरक्षेत केली वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 06:21 AM2022-04-02T06:21:50+5:302022-04-02T06:22:20+5:30
सुरक्षेत वाढ : अमेरिकेवर नाव न घेता पुन्हा केली टीका
इस्लामाबाद : अविश्वास ठरावाचा सामना करणारे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. याबाबत सुरक्षा यंत्रणांना कळविण्यात आले असून खान यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. दरम्यान, इमरान खान यांनी अमेरिकेचे नाव न घेता एक शक्तिशाली देश पाकिस्तानवर नाराज असल्याची पुन्हा टीका केली.
पाकिस्तानचे माहिती व प्रसारण मंत्री फवाद चाैधरी यांनी याबाबत माहिती दिली. इमरान खान यांनी अविश्वास ठरावावर मतदानापूर्वी देशाला उद्देशून भाषण केले हाेते. त्यानंतर लगेचच त्यांच्या हत्येच्या कटाचा इशारा देण्यात आला आहे. खान यांनी भाषणामध्ये सरकारविराेधात आंतरराष्ट्रीय कट असल्याचा दावा केला हाेता. यापूर्वी पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते फैसल वावडा यांनीही असाचा दावा केला हाेता.
सत्ताधाऱ्यांसाठी एप्रिल महिना अनलकी
१ पाकिस्तानमध्ये एप्रिल महिना सत्ताधाऱ्यांसाठी अनलकी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत तीन जणांना एप्रिलमध्येच पायउतार व्हावे लागले आहे. त्यात इमरान खान यांचाही नंबर लागताे का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
२पाकिस्तानचे दुसरे पंतप्रधान ख्वाजा निजामुद्दीन यांचे सरकार १७ एप्रिल १९५३ राेजी बरखास्त केले हाेते. नवाज शरीफ यांनीही १८ एप्रिल १९९३ राेजी राजीनामा दिला हाेता. त्यानंतर युसूफ रजा गिलानी यांनाही २५ एप्रिल २०१२ राेजी राजीनामा द्यावा लागला हाेता. आता इमरान खान यांच्याविराेधातील अविश्वास प्रस्तावावर ३ एप्रिल राेजी मतदान हाेणार आहे. त्यानंतरच त्यांचा फैसला हाेईल.
पुतिन भेटीमुळे नाराजी
इमरान खान म्हणाले की, भारताचे समर्थन करणारा एक शक्तिशाली देश मी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची भेट घेतल्यामुळे नाराज आहे. हाच देश रशियाकडून कच्चे तेल विकत घेणाऱ्या भारताचे समर्थन करीत आहे.
अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळीवर आक्षेप
अमेरिकेतील पाकिस्तानच्या उच्च राजनैतिक अधिकाऱ्यांना पाकिस्तानने समन्स बजावून देशाच्या अंतर्गत गाेष्टींमध्ये ढवळाढवळ करीत असल्याचा आक्षेप पाकिस्तानने नाेंदविला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात खरमरीत पत्रही संबंधित अधिकाऱ्याला दिले आहे. इमरान खान यांनी अमेरिकेवर सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आराेप केला हाेता. ताे अमेरिकेने फेटाळला.