इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:31 AM2018-07-28T01:31:59+5:302018-07-28T01:32:22+5:30

लष्कर व आयएसआयचा वाढेल हस्तक्षेप

Imran Khan does not get majority; Most seats only | इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

इम्रान खानला बहुमत नाहीच; जागा मात्र सर्वाधिक

Next

इस्लामाबाद : नॅशनल असेंब्लीच्या २७२ पैकी ११५ जागा इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) जिंकल्या असून, त्यामुळे त्यांना काठावरील बहुमतही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ६३ व असिफ अली झरदारी पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) ४३ जागा मिळाल्या आहेत.
आता इम्रान खान यांना पीपीपीच्या पाठिंबा मिळणार का, यावर तेथील सत्तेची गणिते अवलंबून आहेत. अशा अस्थिर स्थितीत पाक लष्कर व आयएसआय यांचा इम्रान खान यांच्यावर दबाव वाढणार असून, तसे होणे भारतास त्रासदायक आहे. निवडणुकीत गैरप्रकाराद्वारे इम्रान खानच्या पक्षाने इतक्या जागा मिळवल्याचा आरोप शरीफ यांच्या पीएमएल-एनसह अन्य पक्षांनीही केला. नॅशनल असेंब्लीबरोबरच चार राज्यांच्या असेंब्लींच्या निवडणुकाही झाल्या होत्या. पंजाब प्रांतात नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनला सर्वात जास्त १२७ तर पीटीआयला १२३ जागा मिळाल्या आहेत. मात्र २९७ सदस्य असलेल्या असेंब्लीत बहुमतासाठी १४९ जागा जिंकणे आवश्यक आहे.
शरीफ यांचा बालेकिल्ला असलेला पंजाब त्यांच्याकडून हिसकावून घेण्यासाठी तिथे निवडून आलेल्या अपक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पीटीआयने सुरू केल्या आहेत. एके काळी बेनझीर भुत्तो यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंध प्रांतात त्यांच्याच पीपीपीला बहुमत मिळाले आहे. खैबर पख्तुनख्वा प्रांतात पीटीआयला बहुमत मिळाले आहे तर बलुचिस्तान असेंब्लीच्या ५१ जागांपैकी १३ जागा बलुचिस्तान अवामी पार्टीने जिंकल्या आहेत. पाकिस्तानमधील नव्या सरकारबरोबर काम करण्यास उत्सुक असल्याचे सांगून अमेरिकेने म्हटले आहे की, दक्षिण आशियातील राजकीय स्थैर्य, शांतता वाढीस लागावी म्हणून हे सरकार प्रयत्नशील असेल अशी आशा आहे.

मोदी परतल्यावर ठरणार भारताची पाकविषयीची भूमिका; सत्तांतरावर तूर्त प्रतिक्रिया नाही
-संतोष ठाकूर
नवी दिल्ली : पाकिस्तानातील नवे सरकारबाबत भारताची अधिकृत प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेशातून आल्यानंतरच दिली जाईल. इम्रान खान यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत म्हटले की, तिथे मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे द्विपक्षीय संबंध नवे सरकार आल्यानंतरही सुधारणार नाहीत, असाच अंदाज आहे. या मुद्द्यावर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, आम्ही तूर्तास परिस्थितीचे आकलन करत आहोत.

आगामी काळात देशांमधील संबंध कसे राहतील यावर भारताचे माजी उच्चायुक्त जी. पार्थसारथी म्हणाले की, काश्मीरचा मुद्दा कोणताही पाकिस्तानी नेता सोडून देऊ शकत नाही. इम्रान खान यांच्या पक्षाची स्थापनाच मुळी आयएसआय प्रमुख राहिलेले जनरल हामिद गुल यांच्या सहकार्याने झाली होती. इम्रान खान यांना तालिबान खान म्हटले जाते. तालिबानबाबत इम्रान खान यांची भूमिका सौम्यच आहे. त्यांचे सरकार सैन्याच्या मदतीने बनणार आहे. पाकमधील भारताचे माजी उच्चायुक्तराहिलेले राजीव डोगरा म्हणाले की, आताच काही बोलणे घाईचे ठरेल.

Web Title: Imran Khan does not get majority; Most seats only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.