भारतीय पत्रकाराचा प्रश्न इम्रान खान यांना झोंबला; उत्तर न देताच काढता पाय घेतला; पाहा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 07:27 PM2021-07-16T19:27:53+5:302021-07-16T19:30:41+5:30
भारतीय पत्रकाराच्या थेट प्रश्नानं इम्रान खान यांची गोची; उत्तर न देताच निघून गेले
ताश्कंद: स्वत:ला दहशतवाद पीडीत देशाचे प्रमुख म्हणून घेत संपूर्ण जगाकडून सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले इम्रान खान सध्या उझबेकिस्तानच्या दौऱ्यावर आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना ताश्कंदमध्ये भारत-पाकिस्तान संबंधांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी दोन्ही देशांच्या बिनसलेल्या संबंधांचं खापर राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर फोडलं. यावेळी एका भारतीय पत्रकारानं खान यांना अडचणीचा प्रश्न विचारला. तो प्रश्न खान यांना चांगलाच झोंबला. त्या प्रश्नाचं उत्तर न देता खान यांनी तिथून काढता पाय घेतला.
उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंदमध्ये मध्य आणि दक्षिण आशियाई देशांचं दोन दिवसांचं संमेलन सुरू आहे. या संमेलनासाठी खान ताश्कंदमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एनआयएच्या पत्रकारानं खान यांना एक अडचणीचा प्रश्न विचारला. संवाद आणि दहशतवाद एकाचवेळी होऊ शकतो का? हा प्रश्न मी तुम्हाला भारताकडून थेट विचारतोय, असं पत्रकारानं म्हटलं. या प्रश्नाचं उत्तर देणं खान यांनी टाळलं. दोन देशांमधील कटुतेचं खापर त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर फोडलं.
भारत 🇮🇳 के सवाल पर भड़का और भागा पाकिस्तान..देखिए Tashkent से मेरी Exclusive रिपोर्ट…मेरे सहयोगी @NipunnRajpal
— Ashoke Raj (@Ashoke_Raj) July 16, 2021
के साथ..💪🏽 pic.twitter.com/28CloKZewp
'दोन्ही देशांमधील कटुता संपावी असं आम्हाला वाटतं. वातावरणातील तणाव संपावा अशी आमचीदेखील इच्छा आहे. पण संघाची विचारधारा मध्ये येते,' असं खान म्हणाले. त्यानंतर पत्रकारानं तालिबानशी संबंधित प्रश्न केला. तालिबानवर तुमचं नियंत्रण नाही का, असा प्रश्न पत्रकारानं विचारला. त्या प्रश्नाला उत्तर देणं खान यांनी टाळलं. ते तिथून निघून जाऊ लागले. पत्रकारानं त्यांच्या मागे धाव घेत तोच प्रश्न वारंवार उपस्थित केला. मात्र खान यांनी तिथून काढता पाय घेतला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.