इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ, तोशखाना प्रकरणात अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 05:01 PM2023-02-28T17:01:31+5:302023-02-28T17:02:03+5:30
इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानातील तोशखाना प्रकरणी माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणी वाढत आहेत. इस्लामाबादच्या सत्र न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. या खटल्याची सुनावणी करणारे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जफर इक्बाल यांनी हा निर्णय दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान खान सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जामिनासाठी इस्लामाबाद उच्च न्यायालयात जाणार आहेत. मात्र, यावेळी पोलिसांनी इम्रान खान यांची गाडी इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या मुख्य गेटवर अडवली.
यापूर्वी आज, दहशतवाद विरोधी न्यायालय (ATC) आणि बँकिंग न्यायालयाने इम्रान खान यांना न्यायालयीन आवारात हजर केल्यानंतर अंतरिम जामीन मंजूर केला. त्यांच्यावर दाखल प्रतिबंधित निधी आणि दहशतवादाच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना हा जामीन मिळाला आहे.
एटीसी न्यायाधीश राजा जवाद यांनी दहशतवादी प्रकरणाची सुनावणी केली आणि 100,000 रुपयांच्या जामीन जातमुचलक्यासह 9 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला. दरम्यान, न्यायाधीश रक्षंदा शाहीन यांनी प्रतिबंधित निधीच्या प्रकरणात खानच्या जामीनाला दुजोरा दिला.
दरम्यान, अनेक खटल्यांच्या सुनावणीसाठी इम्रान खान आज तीन न्यायालयात हजर राहणार होते. यामध्ये बँकिंग न्यायालयात प्रतिबंधित निधीचा खटला, दहशतवादविरोधी खटला व आणखी एका न्यायालयात तोशाखाना आणि खुनाचा प्रयत्न आदी प्रकरणांचा समावेश होता.