Imran Khan Pakistan: इम्रान खान इस्लामाबादला निघताच दरवाजा तोडून घरात घुसले पंजाब पोलीस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 02:40 PM2023-03-18T14:40:48+5:302023-03-18T14:41:24+5:30
मी इस्लामाबादला पोहोचल्यावर मला अटक केली जाईल, असे सांगतानाचा व्हिडीओ इम्रान खानने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे
महागडी गिफ्ट विकल्याप्रकरणातील आरोपी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करण्यावरून जोरदार राडा सुरु आहे. इम्रान यांना अटक करण्यासाठी आलेल्या पोलिसांना जबर विरोध झाला होता. पोलिसांवर दगडफेक, गोळीबार, शस्त्रांनी हल्ले झाले होते. यामुळे पोलीस इम्रान खान यांना अटक करू शकले नव्हते. समझोत्यानंतर इम्रान खान आज इस्लामाबादला कोर्टात हजर राहण्यासाठी निघाले.
इम्रान खान बाहेर पडताच तेथील पंजाब पोलिसांनी मोठी ताकद लावून पीटीआय कार्यकर्त्यांच्या वेढ्यात असलेल्या इम्रान खान यांच्या घराचा दरवाजा, काचांच्या खिडक्या तोडून आत प्रवेश केला. यावेळी आतून पोलिसांवर फायरिंगही करण्यात आली होती. परंतू, यात कोणाला इजा झाली नाही. इम्रान खान यांचे लाहोरमधील घर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मी इस्लामाबादला पोहोचल्यावर मला अटक केली जाईल, असे सांगतानाचा व्हिडीओ इम्रान खानने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. माझी अटक ही लंडन प्लॅनचाच भाग आहे. नवाझ शरीफांच्या सांगण्यावरूनच हे केले जात असल्याचा आरोपही इम्रान खान यांनी केला आहे.
पंजाब पोलिसांनी जमान पार्कमधील माझ्या घरावर हल्ला केला आहे. तिथे बुशरा बेगम एकटीच होती. हे कोणत्या कायद्यातून करत आहेत? फरारी नवाझ शरीफ यांना एका नेमणुकीवर सहमत झाल्याच्या बदल्यात पुन्हा सत्तेत आणण्यासाठी हे केले जात असल्याचा आरोर इम्रान खान यांनी केला आहे.
गोळाबार होताच पोलिसांनी पीटीआय कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे. पाण्याचा फवाराही मारण्यात आला आहे. तसेच घराचा दरवाजा तोडण्यासाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला आहे.
दुसरीकडे इम्रान खान इस्लामाबादला कार्यकर्त्यांच्या गराड्यात निघाले आहेत. यावेळी त्यांच्या ताफ्यातील कारला अपघात झाला. काही कार एकमेकांवर आदळल्या.