Imran Khan: पाकिस्तानला अस्थिर करण्याची तयारी; इम्रान खान यांचे सर्व आमदार राजीनामे देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 11:14 PM2022-11-26T23:14:05+5:302022-11-26T23:35:17+5:30
इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आज लाखोंच्या कार्यकर्त्यांसमोर मोठी घोषणा केली आहे. हेलिकॉप्टरने रॅलीला संबोधित करण्यासाठी आलेल्या खान यांच्यासोबत डॉक्टरांची एक टीमदेखील होती. यावेळी त्यांनी देशातील सर्व विधानसभांमधील पीटीआयचे आमदार राजीनामा देणार असल्याची घोषणा केली.
यावेळी इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सरकारवर जोरदार टीका केली आहे. माझ्यावर जो हल्ला झाला, त्यात तीन लोकांचा हात आहे. ते पुन्हा माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप खान यांनी केला. मी मृत्यूला घाबरत नाही, तो तेव्हाच येतो जेव्हा अल्लाहची इच्छा असते. यापुढे या निजामाचा (सिस्टम) भाग राहणार नाही. आमचा पक्ष पीटीआय सर्व विधानसभांचे राजीनामे देणार आहे. आम्ही आमच्या सर्व मुख्यमंत्र्यांची आणि संसदीय पक्षाची बैठक घेणार आहोत, असे खान म्हणाले.
इम्रान खान यांचा पक्ष पंजाब, खैबर पख्तूनख्वा, पाकव्याप्त काश्मीर (पीओके) आणि गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये सत्तेवर आहे. भीती संपूर्ण देशाला गुलाम बनवते. मी पुढाकार घेतला कारण मी मृत्यूला जवळून पाहिले आहे. जगायचे असेल तर मृत्यूची भीती सोडा. पाकिस्तान एका "टर्निंग पॉईंट" वर उभा आहे. आपल्यासमोर दोनच मार्ग आहेत, एक मार्ग आशीर्वाद आणि महानतेचा तर दुसरा मार्ग अनादर आणि विनाशाचा आहे, असे खान म्हणाले.