इम्रान खान यांच्यावर विषप्रयोगाचा प्रयत्न?
By admin | Published: November 7, 2015 02:14 AM2015-11-07T02:14:20+5:302015-11-07T02:14:20+5:30
पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)चे प्रमुख इम्रान खान आणि टी.व्ही. पत्रकार रेहम खान यांचा घटस्फोट झाल्यापासून एकामागे एक दावे-प्रतिदावे केले जात असून, वेगवेगळे अंदाज
नवी दिल्ली : पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ (पीटीआय)चे प्रमुख इम्रान खान आणि टी.व्ही. पत्रकार रेहम खान यांचा घटस्फोट झाल्यापासून एकामागे एक दावे-प्रतिदावे केले जात असून, वेगवेगळे अंदाज बांधण्यात येत आहेत. अशाच एका दाव्यानुसार पक्षावर ताबा मिळविण्यासाठी त्याची पत्नी रेहम खान हिने त्याला विष दिल्याचे बोलले जात आहे.
इमरान खान काही दिवसांपूर्वी आजारी पडले होते. त्यावेळी त्यांच्या शरीरात विषाचे काही अंश सापडले होते. रेहम खान इम्रानला विष देऊन पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षावर नियंत्रण मिळवू इच्छित असल्याचा इशारा गुप्तचरांनी अगोदरच दिला होता, असा दावा अन्य एका पत्रकाराने केला आहे. असे असले तरी खरोखरच रेहम खानने इम्रानला विष देण्याचा प्रयत्न केला होता काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पाकिस्तानच्या एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी पत्रकार अतिरिक्त निजामी यांनी केलेल्या गौप्यस्फोटाने हा प्रश्न उभा राहिला आहे. रेहमचे हेतू चांगले नाहीत, असे गुप्तचरांनी इम्रान आणि त्याच्या निकटवर्तीयांना अगोदरच कळविले होते, असा गौप्यस्फोट अतिरिक्त निजामी यांनी केला होता. निजामी यांनी यापूर्वीही असे सनसनाटी दावे केले होते.
त्यांनीच डिसेंबर २0१४ मध्ये या दोघांच्या लग्नाची बातमी सर्वात अगोदर फोडली होती. तसेच दोघांच्या घटस्फोटाची बातमीही त्यांनीच सर्वात अगोदर दिली होती. इम्रान आणि रेहम यांच्यातील संबंध सप्टेंबरमध्ये इतके विकोपाला गेले होते की, त्यात सुधारणा होण्यास मुळीच वाव नव्हता. रेहमने इम्रानचे जीवन एक प्रकारे दु:स्वप्न बनविले होते आणि दोघांनीही सहमतीने वैवाहिक संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. दोघांत नेहमी भांडणे होत.
घटस्फोटाच्या दोन दिवस आधीच दोघांत कडाक्याचे भांडण झाले होते. त्यात पक्ष कसा चालवावा हे मी सांगते, असे कथितरीत्या रेहमने इमरानला सांगितले होते. त्यानंतर एका परिसंवादाच्या निमित्ताने रेहमला लंडनला पाठविण्यात आले आणि त्यानंतर लगेचच इम्रानने तिला घटस्फोटाची नोटीस ई-मेल केली.
ही नोटीस म्हणजे रेहमला मोठाच हादरा होता, असे निजामी यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
इशारा : विवाह न करण्याबद्दल दिला होता
विशेष म्हणजे दोघांचे लग्न वर्षभरही टिकले नाही. या दोघांनीही घटस्फोटाचे कारण सांगितले नाही. इम्रानच्या जवळ असल्याचा दावा करणारे अन्य एक पत्रकार शाहीद मसूद यांच्या मते रेहमशी लग्न न करण्याबाबत इम्रानच्या बहिणीने त्याला अगोदरच खूप समजावले होते.
काही दिवसांपूर्वी लाडू खाल्ल्याने इम्रान आजारी पडले. त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले असता त्यांच्या शरीरात उंदीर मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधींचा अंश सापडला होता. गुप्तचरांनीही इम्रानला रेहमशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता.
संबंध बिघडले : रेहमलाही इम्रानशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता, पण त्यांनी लग्न केले. महत्त्वाकांक्षी रेहम राजकारणात येऊ पाहत होती. त्यातून दोघांचे संबंध बिघडत गेले.