इम्रान खान यांनी भारताविरुद्ध सांभाळून बोलावे, संयम पाळण्याचे ट्रम्प यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:09 AM2019-08-21T04:09:22+5:302019-08-21T04:09:31+5:30
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काश्मीरबाबत विधाने करताना संयम बाळगण्यास सांगितले.
वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध सांभाळून, मर्यादेत बोलावे, असा सल्ला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इम्रान खान यांना दिला आहे. ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. कठीण परिस्थितीपासून वाचण्यासाठी दोन्ही देशांनी संयम बाळगावा, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यात सोमवारी ३० मिनिटे फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी चर्चा केली. फोनवरील चर्चेदरम्यान मोदी यांनी ट्रम्प यांना हे निदर्शनास आणून दिले होते की, पाकिस्तानचे नेते भारताविरुद्ध चिथावणीखोर विधाने करीत आहेत.
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांनी इम्रान खान यांच्याशी फोनवरून चर्चा केली. काश्मीरबाबत विधाने करताना संयम बाळगण्यास सांगितले. काश्मीर प्रश्नावर भारताविरुद्ध आपली मोहीम सुरू ठेवताना इम्रान खान रविवारी असे म्हणाले होते की, भारत सरकार हे हुकूमशाही आणि वर्चस्ववादी आहे. तसेच, पाकिस्तान आणि भारतातील अल्पसंख्याकांसाठी हा धोका आहे. भारताच्या अण्वस्त्र सुरक्षेबाबत जगाने विचार करायला हवा, कारण त्याचा जगावर परिणाम होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी चर्चा केल्यानंतर ट्रम्प यांनी टष्ट्वीट केले आहे की, माझे दोन चांगले मित्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशी व्यापार, भागीदारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीरवरील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली. कठीण परिस्थिती, पण चांगली चर्चा असेही त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही : इंग्लंड
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या (यूएनएससी) १६ आॅगस्टच्या बैठकीत इंग्लंडने चीन अथवा पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही, अशी माहिती इंग्लंडच्या परराष्ट्रविषयक सूत्रांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, या चर्चेत आम्ही भारताविरुद्ध चीनची साथ दिली नाही.
- काश्मीर मुद्यावर आमचे दीर्घ काळापासून असे मत आहे की, यावर भारत आणि पाकिस्तानने मिळून तोडगा काढायला हवा. या बैठकीनंतर कोणतेही अधिकृत स्टेटमेंट जारी करण्यात आले नाही. ५० ते ६० वर्षांत संयुक्त राष्ट्रांनी काश्मीरवर बोलावलेली ही पहिलीच बैठक आहे.
- इंग्लंडच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फ्रान्स आणि अमेरिकेने भारताचे समर्थन केले नाही. चीनने मात्र पाकिस्तानचे समर्थन केले. चीन हा संयुक्त राष्ट्रांमध्ये नेहमीच पाकिस्तानची बाजू घेत आलेला आहे.
- रशियाने नेमकी काय भूमिका घेतली होती? याची माहिती मिळू शकली नाही. संयुक्त राष्ट्रातील रशियाचे प्रतिनिधी दिमित्री पॉलान्सकी यांनी शुक्रवारी टष्ट्वीट केले होते की, काश्मीरचा मुद्दा भारत आणि पाकिस्तानने द्विपक्षीय स्तरावर सोडवावा.