इम्रान यांच्यावर झाला होता ४ ठिकाणांवरून गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 10:02 AM2023-01-05T10:02:46+5:302023-01-05T10:02:56+5:30
वजिराबाद येथे एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता.
इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर एक नव्हे, तर चार वेगवेगळ्या ठिकाणांहून ४ शार्प शूटर्सनी गोळ्या झाडल्या होत्या. या नेमबाजांनी खूप उंचावरून गोळ्या मारल्याचा खुलासा संयुक्त तपास पथकाने (जेआयटी) केला आहे.
वजिराबाद येथे एका रॅलीदरम्यान इम्रान खान यांच्यावर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी जीवघेणा हल्ला झाला होता. यावेळी नेमबाज नावेद मेहर हा हाती लागला होता. उर्वरित तीन नेमबाज कोण होते, हे तपास पथकाने स्पष्ट केले नाही. इम्रान खान यांना तीन गोळ्या लागल्याचे तपास पथकाने म्हटले आहे. हल्ला झाला तेव्हा ते त्यांच्या समर्थकांसह कंटेनरवर उभे होते. अगदी जवळ उभा असलेल्या नावेदने एके-४७ ने गोळीबार केला. (वृत्तसंस्था)
नावेदने सांगितले हल्ल्याचे कारण...
इम्रान खान यांच्यावरील हल्ला प्रकरणात जमावाच्या तावडीत सापडलेला नावेद हा प्रशिक्षित किलर असून, तो त्याच्या साथीदारांसह घटनास्थळी उपस्थित होता. नावेद पॉलिग्राफ चाचणीतही नापास झाला होता. इम्रान यांच्या रॅलीत अजानच्या वेळी डीजे वाजत होता, त्यामुळे खान यांना मारायचे होते, असे त्याने सांगितले होते.