Imran Khan: 'त्यांना चांगला धडा शिकवू, त्यांचे राजकारणा कबरीत दफन करणार', इम्रान खान यांचा विरोधकांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 07:03 PM2022-04-05T19:03:39+5:302022-04-05T19:05:01+5:30
Imran Khan: 'ज्यांनी परकीय शक्तींसोबत देशाविरोधात कट रचला, त्यांना पाकिस्तानची जनता कधीच माफ करणार नाही.'
इस्लामाबाद:पाकिस्तानचे(Pakistan) काळजीवाहू पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) यांनी मंगळवारी लाहोरमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानचे सरकार पाडण्यासाठी परकीय षड्यंत्र रचल्याचा आरोप केला आहे. या कटातील अनेक सूत्रधारांना आपण या कटाचा एक भाग बनत आहोत याची कल्पनाही नव्हती, असे ते म्हणाले. तसेच, पाकिस्तानात येत्या तीन महिन्यांत निवडणुका होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
इम्रान खान यांनी आज पुन्हा परकीय षड्यंत्राचा उल्लेख केला आणि म्हणाले, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर परकीय षडयंत्र रचले गेले. त्यांनी आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. हे तेच लोक आहेत, ज्यांचे पैसे परदेशात आहेत. तुम्ही गुलाम आहात, आम्ही नाही. आम्ही स्वतंत्र आहोत, आम्ही कोणाचीही गुलामगिरी करत नाही. जे पीटीआयचे मत मिळवून आपला आत्मा विकत आहेत, त्यांना आजीवन बंदी भोगावी लागेल."
त्यांचे राजकारण दफन करू...
इम्रान खान पुढे म्हणाले की, यावेळी आम्ही विरोधकांना चांगला धडा शिकवू. हा देश त्यांना सोडणार नाही. आम्ही त्यांचे राजकारण कबरीत दफन करू, असा इशाराच त्यांनी यावेळी दिला. तसेच, आम्ही आमच्या भूतकाळातून शिकलो, आता त्या चुका सुधारणार आणि कोणाला तिकीट द्यायचे यावर बारीक लक्ष देणार, असेही म्हणाले. यावेळी पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून म्हणाले की, तुम्हा सर्वांना निवडणुकीची तयारी करावी लागेल.