पाकच्या भल्यासाठी कायपण... इम्रान खान चीनची साथ सोडण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 02:42 PM2018-08-13T14:42:00+5:302018-08-13T14:42:34+5:30
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी इम्रान खान शपथ घेणार आहेत. मात्र, त्यांच्यापुढील देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्याचे आव्हान पाहता चीनची साथ सोडणेच हिताचे ठरण्याची शक्यता आहे. कारण, चीनकडून विकासकामांसाठी कर्ज घेतलेल्या देशांबाबत अमेरिकेने आखडते धोरण स्वीकारले असून असे झाल्यास पाकला बेलआऊट पॅकेजपासून मुकावे लागणयाची शक्यता आहे. यामुळे इम्रान हे चीनची साथ सोडण्याचेही पाऊल उचलू शकतात.
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये इम्रान खान यांनी देशाला तीन महिन्यांत आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अमेरिकेने पाकिस्तानला जाहीर केलेले बेलआऊट पॅकेज आंतरराष्ट्रीय मुद्रा कोषाने मंजूर न केल्यास पाकच्या अर्थव्यवस्थेला स्थिर करणे इम्रान यांना शक्य होणारे नाही. यातच अमेरिकन संसदेच्या 16 सदस्यांनी चीनकडून कर्ज घेणाऱ्या देशांना आर्थिक मदत देण्यापासून रोखण्यासंबंधी मागणी केली आहे.
इम्रान खान हे अशावेळी पंतप्रधान पदावर येत आहेत जेव्हा पाकला तात्काळ मदतीची गरज आहे. यामुळे त्यांना चीन किंवा बेलआऊट पॅकेज यापैकी एकाला निवडावे लागणार आहे. यादरम्यान, आयएमएफ पाकला विदेशातून पैसे घेण्यास मनाई करून शकते. त्याचवेळी खान यांनी चीनला सीपेक प्रकल्पामध्ये पेचिंगद्वारे 62 अरब डॉलरच्या गुंतवणुकीवर सकारात्मक राहण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे खान यांच्यासमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
अमेरिकी सदस्यांनी यावेळी पाकसोबत श्रीलंका आणि जिबुती या देशांचाही उल्लेख केला आहे. या देशांनी चीनकडून कित्येक अरब डॉलरचे कर्ज उचलले आहे. मात्र, ते फेडण्यास असमर्थ ठरले आहेत. यामुळे बेलआऊट पॅकेजचे पैसे घेऊन ते चीनच्या कर्जाला वळते करण्यात येतील अशी भीती सदस्यांनी व्यक्त केली आहे.