इम्रान खानच्या ट्विटर फॉलोईंग यादीत एकही भारतीय नाही, पण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2018 05:38 PM2018-07-30T17:38:47+5:302018-07-30T17:50:29+5:30
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला 116 जागांवर विजय मिळाला.
इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाने पाकिस्तान सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवले. इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाला 116 जागांवर विजय मिळाला. त्यानंतर त्यांचा पक्ष पाकिस्तान लोकसभा सभागृहातील सर्वात मोठा पक्ष बनला आहे. त्यामुळे, समविचारी पक्षांना सोबत घेऊन इम्रान खान सरकार स्थापन करणार असून ते 11 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. दिग्गज क्रिकेटर आणि पाकिस्तानचे भावी पंतप्रधान इम्रान हे ट्विटवरुन केवळ 19 जणांनाच फॉलो करतात. त्यामध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही. पण, बिग बी अमिताब बच्चन इम्रान यांच्या फॉलोअर्सच्या यादीत आहेत.
पाकिस्तानमधील निवडणुकांमध्ये इम्रान खान यांच्या पक्षाचा विजय झाल्यानंतर इम्रान हेच भावी पंतप्रधान बनतील, असा निष्कर्ष निघला आहे. तर, इम्रान यांचे पंतप्रधानपद भारताला धोक्याचे असल्याचेही अनेकांनी म्हटले. मात्र, क्रिकेटच्या माध्यमातून भारताशी सौहार्दाचे संबंध इम्रान यांचे बनल्याचेही काही क्रीडा समिक्षकांनी सांगितले. मात्र, एकंदरीतच इम्रान यांच्या ट्विटर अकाऊंटचा अभ्यास केल्यास त्यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. इम्रान यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन आतापर्यंत 5568 ट्विट्स केले आहेत. त्यातील शेवटचे ट्विट हे 25 जुलै करण्यात आले असून क्वेटा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध या ट्विटमधून नोंदविण्यात आला आहे.
इम्रान यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या 8.15 मिलियन्स म्हणजेच 81 लाख 50 हजार एवढी आहे. तर इम्रान आपल्या ट्विटरवरुन केवळ 19 जणांना फॉलो करतात. त्यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये एकाही भारतीय व्यक्तीचा समावेश नाही. विशेष म्हणजे ज्या क्रिकेट विश्वातून इम्रान यांचे नाव मोठे झाले, त्या क्रिकेट विश्वातील एकही भारतीय व्यक्ती इम्रान यांच्या फॉलोईंग लिस्टमध्ये नाही. इम्रान फॉलो करत असलेल्या 19 जणांमध्ये पाकिस्तानमधील राजकीय नेते आणि पत्रकारांचा समावेश आहे. या 19 जणांपैकी 2 महिला असल्याचे दिसून येते. पण, बिग बी अमिताभ बच्चन हे इम्रान खान यांना फॉलो करत असल्याचे ट्विटरवरुन दिसत आहे. तर, इम्रान यांच्या या फॉलोईंग लीस्टमध्ये एकही भारतीय नसल्याने त्यांचे खरच भारताशी सौहार्दाचे संबध राहतील का, असा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान, इम्रान यांचे नाव पाकिस्तानच्या पंतप्रधानपदासाठी घेण्यात येताच भारतातील जम्मू आणि काश्मीरमधून त्यांच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या वाढली आहे. त्यानंतर, अनुक्रमे अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, झारखंड आणि दादर व नगर हवेली येथून इम्रान यांच्या फॉलोअर्सच्या संख्येत वाढ झाली आहे.