काश्मीर प्रश्नावर जगात पाकिस्तान एकाकी पडलं; इम्रान खानची ट्रम्प यांच्याकडे याचना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 10:23 AM2019-08-17T10:23:01+5:302019-08-17T17:18:12+5:30
पाकिस्तानचे पंतप्रधान काश्मीर मुद्द्यावरुन अनेक देशांच्या संपर्कात आहेत.
इस्लामाबाद - जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर भारत-पाक या दोन्ही देशांमध्ये तणाव वाढलेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा पाकिस्तानने उचलला मात्र पदरी निराशा पडल्याने पाकिस्तान सैरभैर झाला आहे. काश्मीर प्रश्नावरुन पाकिस्तानचे सर्व मार्ग बंद झाले आहेत. पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. जवळपास 20 मिनिटे या दोघांमध्ये चर्चा झाली. ही चर्चा काश्मीर मुद्द्यावरुन झाल्याचं सांगण्यात येतंय.
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरैशी यांनी सांगितलं की, इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीनंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विश्वासात घेतलं. पंतप्रधान काश्मीर मुद्द्यावरुन अनेक देशांच्या संपर्कात आहेत. काश्मीर प्रकरणावर अन्य देशांचे समर्थन मिळविण्याची महत्वाची भूमिका इम्रान खान पार पाडत आहेत. यापूर्वीही इम्रान खान यांनी जगातील अन्य देशांचे समर्थन मिळविण्यात अपयशी ठरल्याने स्नेब्रेनिका हिंसाचाराची आठवण करुन देत जगाला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला.
Jammu And Kashmir: संयुक्त राष्ट्रात चीनचे पाकच्या सुरात सूर https://t.co/NAKcBIjhIH
— Lokmat (@MiLOKMAT) August 16, 2019
काश्मीर प्रकरणावरुन संयुक्त राष्ट्र परिषदेच्या बैठकीत चर्चा करु असं चीनने सांगून पाकिस्तानला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शुक्रवारी ही बैठक बंद दरवाजाआड झाली. पण या बैठकीत काश्मीर प्रश्नावरुन पुन्हा पाकिस्तानला अपयश आलं. बंद दरवाजा बैठकीत काश्मीर प्रकरणावर चर्चा केली खरी, पण त्या प्रश्नात लक्ष घालण्याचा अधिकारच संयुक्त राष्ट्रांना नसल्याचे सांगून रशियाने चीन व पाकिस्तानचे प्रयत्न उधळून लावले. त्यामुळे चीन सुरक्षा परिषदेत तोंडघशी पडला आहे. त्यानंतर भारतानेही हा आमचा अंतर्गत मामला आहे, त्यात अन्य देशांनी पडण्याचे कारण नाही, अशा शब्दांत बाजू मांडली.
भारत व पाकिस्तान यांनी परस्पर चर्चा करून त्यांच्यातील प्रश्न सोडवावा, संयुक्त राष्ट्रांनी त्यात पडण्याचे कारण नाही, असे सांगून रशियाच्या प्रतिनिधीने थेट भारताची बाजूच लावून धरली. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सनेही तीच भूमिका मांडली. या बैठकीत पाकिस्तान व भारत यांना बोलावण्यात आले नव्हते. सुरक्षा परिषदेच्या कायम प्रतिनिधींना व काही देशांच्या प्रतिनिधींना या बैठकीचे निमंत्रण होते. पाकिस्तानने आधी आंतरराष्ट्रीय पातळीवर व संयुक्त राष्ट्रांत काश्मीरविषयक भारताच्या निर्णयाचा प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. त्यानंतर चीनने काश्मीरच्या विभाजनाचा मुद्दा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत नेला. त्यावर संयुक्त राष्ट्रांचे अधिवेशन बोलावले जाणे शक्यच नसल्याने बंद दरवाजा वा गुप्त बैठक बोलवावी, अशी चीनची विनंती होती. चीनच्या या मागणीला अर्थातच पाकिस्तानचा पाठिंबा होता. पण या बैठकीत कुवेत वगळता कोणत्याच देशाने चीनला वा अप्रत्यक्षपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला नाही, असे समजते.