इम्रान यांचा शपथविधी अनिश्चित, कायदेशीर अडचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 04:23 AM2018-08-09T04:23:08+5:302018-08-09T04:23:23+5:30
पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पंतप्रधानपदी शपथविधी १४ आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी होईल, असे पक्षाने जाहीर केले
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या संसदीय निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या ‘पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफ’ (पीटीआय) पक्षाचे अध्यक्ष व माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांचा पंतप्रधानपदी शपथविधी १४ आॅगस्ट या पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनापूर्वी होईल, असे पक्षाने जाहीर केले असले तरी अजूनही काही कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायची असल्याने शपथविधीच्या नेमक्या तारखेविषयी अनिश्चिता कायम आहे.
इम्रान खान यांनी एकूण पाच मतदारसंघांतून निवडणूक लढविली होती. त्यापैकी तीन ठिकाणी ते विजयी झाल्याचे निवडणूक आयोगाने अधिकृतपणे जाहीर केले आहे. बाकीच्या दोन मतदारसंघांत इम्रान खान यांनी निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याच्या तक्रारींवर अद्याप निर्णय व्हायचा असल्याने तेथील निकाल आयोगाने राखून ठेवले आहेत. यामुळेच ते शपथ घेऊ शकतील
नाही याची अनिश्चितता कायम
आहे. (वृत्तसंस्था)
>कडक कारवाईची शक्यता कमीच
नकाल राखून ठेवलेल्या दोनपैकी एका जरी मतदार संघात त्यांना आचार संहितेचा भंग केल्याबद्दल आयोगाने दोषी ठरविले, तर त्यांचे पाचही मतदार संघांतील सदस्यत्व रद्द होईल. मात्र, निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षात जनतेने दिलेला मोठा कौल पाहता आयोगाने दोषी ठरविले, तरी ताकीद देण्याखेरीज आणखी काही कडक दंडात्मक कारवाई होईल, असे राजकीय निरीक्षकांना वाटत नाही.