मज्जाच मजा! ४ दिवस काम, तीन दिवस रजा; घरी गेल्यानंतर कामाचे निरोपही पाहू नका
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 06:46 AM2022-02-19T06:46:50+5:302022-02-19T06:47:32+5:30
हे नवीन कामगार कायदे येत्या काही दिवसांमध्येच लागू करण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली : आता आठवड्यातून केवळ चार दिवसच काम करावे लागणार असून, तीन दिवस रजा मिळणार आहे. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरी गेल्यानंतर कामाचे निरोप पाहायचीही गरज राहणार नाही. बेल्जियममधील कर्मचाऱ्यांना ही सुविधा मिळणार आहे. देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी कामगार कायदे बदलण्याचा निर्णय पंतप्रधान अलेक्झांडर डी. क्रू. यांनी घेतला आहे. त्यानुसार, कर्मचाऱ्यांना आठवड्यातून पाचऐवजी फक्त चार दिवस काम करावे लागणार आहे.
कामगार कायद्यांतील बदलांबाबत आपल्या मंत्र्यांबाबत रात्रभर चाललेल्या चर्चेनंतर अलेक्झांडर पत्रकारांना म्हणाले की, कोरोनामुळे आम्हाला अधिक लवचीकपणे काम करणे भाग पडले आहे. कर्मचाऱ्यांनाही त्यानुसार सवलत देणे आवश्यक आहे. या कायद्यांतर्गत सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कामाचे तास संपल्यानंतर आपल्या ॲाफिसमधील फोन बंद ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बेल्जियम सरकारच्या या बदलांमुळे येथील लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि त्यांना अधिक चांगले काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे. हे नवीन कामगार कायदे येत्या काही दिवसांमध्येच लागू करण्यात येणार आहेत.
काय आहे कायद्यांत?
नवीन कायद्यानुसार कर्मचाऱ्यांना पाचऐवजी चार दिवसांमध्ये ३८ तास काम करावे लागेल. यामुळे कर्मचाऱ्यांना अधिक मोठी सुटी घेता येईल. या अंतर्गत एखाद्या कर्मचाऱ्याला आठवड्यात जास्त तास काम करण्याची परवानगी दिली जाईल, जेणेकरून तो पुढील आठवड्यात कमी काम करेल. मात्र, यासाठी त्याला बॉसची परवानगी घ्यावी लागेल.
या देशांमध्ये असते केवळ चार दिवस काम
स्कॉटलंड, आइसलंड, स्पेन, जपान, संयुक्त अरब अमिराती.