चीनमध्ये लोकांकडे ना नोकरी, ना पैसा, पण धडाक्यात होतेय कंडोमची विक्री, कारण ऐकून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:43 PM2023-07-30T14:43:45+5:302023-07-30T14:48:05+5:30
Condom Sale In China: चीनमधील बाजाराची स्थिती खराब झालेली आहे. मात्र तरीही येथे कंडोमच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे.
इतर देशांना वारेमाप कर्जवाटप करतानाच सीपेकसारख्या प्रकल्पांमध्ये अब्जावधी रुपये अडवलेल्या चीनमधील आर्थिक परिस्थित हळुहळू बिघडत आहे. समोर येत असलेली आर्थिक आकडेवारी याला दुजोरा देत आहे. चीनमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसेच नोकरीच्या शोधात असलेले तरुण सोशल मीडियावर चित्रविचित्र मोहिमा चालवत आहेत. रियल इस्टेट तसेच शिक्षण क्षेत्र मंदीच्या गर्तेत सापडलं आहे. एकूणच चीनमधील बाजाराची स्थिती खराब झालेली आहे. मात्र तरीही येथे कंडोमच्या विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. ही वाढ चर्चेचा विषय ठरली आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेतील तज्ज्ञांच्या मते आकडेवारीनुसार चीनमध्ये कंझ्युमर सेंटिमेंट्समध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. मात्र कंडोमच्या विक्रीचा विषय येतो तेव्हा थोडं वेगळं चित्र दिसतं. कंडोम निर्माता कंपन्या अडचणीत सापडलेल्या चिनी बाजारामध्ये धडाक्यात नफा कमवत आहेत. चीनमध्ये कंडोम निर्माता कंपन्यांची विक्री आणि उत्पन्न धडाक्यात वाढत आहे. चिनी अर्थशास्त्रज्ञांनाही या गोष्टीमुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. एकीकडे अर्थव्यवस्था कोसळत आहे. मंदीचं सावट आहे आणि असं असतानाही चीनी तरुण हे मात्र मोठ्या प्रमाणावर कंडोमची खरेदी करत आहेत.
रॉयटर्सच्या एका रिपोर्टनुसार ड्युरेक्स बनवणारी कंपनी रेकिटने आपल्या हल्लीच दिलेल्या माहितीमध्ये सांगितले की, महागाई, बेरोजगारी आणि मंदीचा धोका अशा परिस्थितीतही चिनी तरुण मोठ्या प्रमाणावर कंडोम खरेदी करत आहे.
तर एनबीएसच्या एका रिपोर्टनुसार, जून महिन्यात चीनमध्ये किरकोळ विक्रीमध्ये खूप घट झाली आहे. जून महिन्यातील एकूण विक्रीची तुलना मे महिन्यातील विक्रीसोबत केली तर ती १२.७ टक्के वाढीवरून घटून ३.१ टक्क्यांवर आली आहे. किरकोळ विक्री आणि निर्यात क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. अनेक कारणांमुळे देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. हाताला काम नसल्याने ते घरी रिकामटेकडे बसले आहेत. तेच चीनमध्ये कंडोमची विक्री मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे.
चीनमध्ये कंडोम कंपन्यांचा नफा दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. कोरोनाकाळाच्या सुरुवातीला लागलेल्या लॉकडाऊनवेळीही चीनमध्ये कंडोमची विक्री वाढली होती. आता कंडोमच्या विक्रीचा तोही विक्रम मोडीत निघण्याची शक्यता आहे.