हृदयी वसंत फुलताना...! चीननं कॉलेज विद्यार्थ्यांना दिली 'स्पेशल' ७ दिवस सुट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 11:51 AM2023-04-03T11:51:12+5:302023-04-03T11:51:54+5:30
चीनच्या अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एक आठवड्यासाठी स्प्रिंग ब्रेक देण्याची घोषणा केली आहे
नवी दिल्ली - वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीननं अनेक कायदे केले होते. त्याचा आता उलट परिणाम पाहायला मिळत आहेत. चीनमध्ये मुलांचा जन्मदर घसरत असल्याने सरकार चिंतेत आले आहे. आता चीनमधील जोडप्यांनी जास्त बाळांना जन्म द्यावा यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. देशातील जन्म दर वाढवण्यासाठी सरकार नवनवीन निर्णय घेत आहेत. त्यात आता सरकारसोबत शैक्षणिक संस्थांनीही पुढाकार घेतला आहे.
मियायांग फ्लाइंग वोकेशनल कॉलेजनं त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली आहे. स्प्रिंग बेक हा चीनमधील युवक युवतींना वसंत ऋतु फुलताना प्रेमाचा बहर उमलावा यासाठी देत आहे. चीनच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रेम आणि रोमान्स करण्यासाठी सुट्टी दिली आहे. एनबीसी न्यूजनुसार, चीनच्या अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना एक आठवड्यासाठी स्प्रिंग ब्रेक देण्याची घोषणा केली आहे. मियायांग फ्लाइंग वोकेशनल कॉलेजनं पहिल्यांदा या ब्रेकची २१ मार्चला घोषणा केली.
स्प्रिंग ब्रेक घोषणेनुसार, लियांग गुओहुई मियायांग फ्लाइंगच्या डिप्टी डिनने सांगितले की, या सुट्टीच्या काळात युवक युवती निसर्गाशी एकरूप होऊन अनेक ठिकाणी जातील, वसंत ऋतुचा आनंद घेतील. यातून केवळ विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होणार नसून पुन्हा वर्गात आल्यानंतर त्यांची शैक्षणिक आणि बौद्धिक क्षमताही वाढवेल. त्याशिवाय शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना तुमच्या प्रेमाचा शोध घ्या असंही सूचित करण्यात आले आहे.
१ एप्रिल ते ७ एप्रिल दरम्यान सुट्टी
मियायांग कॉलेजप्रमाणे अन्य कॉलेजनेही १ एप्रिल ते ७ एप्रिल या काळात सुट्टीची घोषणा केली आहे. निसर्गाशी प्रेम, आयुष्यातील प्रेम करण्यासाठी त्याचा आनंद घेण्यासाठी स्प्रिंग ब्रेक दिला जात आहे. तसेच या स्प्रिंग ब्रेकमध्ये तुम्ही केलेल्या कार्याचे अनुभव शेअर करण्यासही सांगितले आहेत. त्यात पार्टनरसोबत ट्रिप, साइटिंग व्हिडिओ बनवणेही सामील आहेत.
जन्मदर वाढवण्यासाठी आणलीय योजना
न्यूज एजेंसी रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, चीन कॉलेज प्रशासनाने सरकारच्या निर्देशावर जन्मदर वाढवण्यासाठी ही अजब योजना आणली आहे. देशातील जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारने २० हून अधिक शिफारशी आणल्या आहेत. त्यातून कॉलेजमध्ये स्प्रिंग ब्रेक देण्यात येत आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेमाचा शोध घेण्यास वेळ मिळेल.