पाकिस्तानी राज्यकर्त्यांना हादरे देणारी ‘साडी’; पाकच्या बहुसांस्कृतिकतेला प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2022 08:27 AM2022-03-19T08:27:59+5:302022-03-19T08:28:12+5:30
सुरुवातीला केलेला, त्यांचा ‘साडी नेसण्याचा’ उल्लेखही अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
शीमा कर्मानी. ‘साडी’ नेसणाऱ्या, भरतनाट्यम नृत्य करणाऱ्या प्रसिद्ध पाकिस्तानी शास्त्रीय नर्तिका. त्यांच्या नृत्यामुळं जगभरात त्या प्रसिद्ध आहेत; पण एवढ्यावरच त्यांचं मोठेपण संपत नाही. त्या सामाजिक कार्यककर्त्या आहेत, ‘तहरीक-ए-निस्वां कल्चरल ॲक्शन ग्रुप’च्या संस्थापक आहेत. याशिवाय कोरिओग्राफर, डान्स गुरू, थिएटर प्रॅक्टिशनर, परफॉर्मर, दिग्दर्शक, निर्माता, टीव्ही अभिनेत्री, असं त्यांचं कर्तृत्व फार मोठं आहे. आज त्यांचं वय ७१ वर्षे आहे; पण आजही पाक सरकारच्या नाकात दम आणण्याची ताकद आणि हिंमत त्यांच्यात आहे.
सुरुवातीला केलेला, त्यांचा ‘साडी नेसण्याचा’ उल्लेखही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कारण याच ‘साडी’च्या आयुधाद्वारे त्यांनी पूर्वी अगदी झिया उल हक यांच्या पाकिस्तानी सरकारलाही हादरे दिले होते. कारण पाकिस्तानात आजही अनेक भागांत साडी हा ‘गैर इस्लामिक’ पोशाख मानला जातो. ज्या काळात त्या साडी नेसून पाकिस्तानात सर्वत्र वावरत होत्या, भारतीय भरतनाट्यम नृत्य करीत होत्या, त्या काळात हे मोठंच बंडखोरीचं लक्षण होतं. यामुळे पारपंरिक विचारसरणीच्या कट्टरपंथीयांकडून तर अनेकदा त्यांना धमक्या मिळल्याच; पण खुद्द पाकिस्तान सरकारनंही त्यांच्या वाटेत काटे पेरण्याचा, त्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यामुळं त्या हिंमत तर हरल्या नाहीतच; पण त्यांच्या मनातल्या क्रांतीच्या ज्वाला अधिकच उफाळून आल्या. त्यांच्या ज्या साडीला कट्टरवाद्यांचा विरोध होता, त्याच साडीला त्यांनी विरोधाचं प्रतीक केलं आणि एका अतिशय शालीन तरीही प्रखर भूमिकेद्वारे त्यांनी महिला सन्मानाची चळवळ उभी केली. या साडीलाच त्यांनी स्त्रियांच्या समानतेचं, अन्यायाविरुद्ध लढण्याचं बिरुद बनवलं. गेली ५० वर्षे झाली, अजूनही त्या लढताहेत. ‘औरत’ ही दुर्लक्ष करण्याची गोष्ट नाही, तर शक्तीचं प्रतीक आहे, हे त्यांनी समाजात ठसवलं.
पाकिस्तानात आजही महिलांना कस्पटासमान वागणूक दिली जाते. तरीही काही महिला या अन्यायाविरुद्ध आपला आवाज बुलंद करतातच, हा आवाज क्षीण असला, तरी त्यात वाढ होते आहे. विशेषत: गेल्या पाच वर्षांपासून पाकिस्तानात अंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं ‘औरत मार्च’ काढला जातो. आपल्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी या महिला अधिकाधिक आक्रमक होत आहेत. त्यांना समाजातून पाठिंबाही मिळतो आहे आणि यात समाील होणाऱ्या महिलांची संख्याही वाढते आहे. त्यामुळे या औरत मार्चकडे सरकारही गांभीर्यानं पाहू लागलं आहे, खरं तर महिलांच्या या माेर्चाची सरकारला भीती वाटू लागली आहे. अनेक समस्यांनी आधीच जर्जर असलेल्या इमरान खान यांच्या सरकारलाही यंदा या मोर्चामुळे धडकी भरली होती. हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न सरकारनं केला; पण महिलांनी त्याला दाद दिली नाही.
याच ‘औरत मार्च’मधलं आजही एक प्रमुख नाव आहे, ते म्हणजे शीमा कर्मानी. वयाची सत्तरी ओलांडून गेली, तरीही ना त्यांनी नृत्य सोडलं, ना साडी नेसणं सोडलं, ना कट्टरवाद्यांना आव्हान देणं सोडलं, ना महिलांना एकत्र करून त्यांना त्यांच्या शक्तीची जाणीव करून देणं.
शीमा या भारत आणि पाकिस्तानी वंशाच्या आहेत. शीमा यांच्या आई भारतात हैदराबाद येथे राहत होत्या. भारत-पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर त्यांचं कुटुंब पाकिस्तानात रावळपिंडी येथे स्थलांतरित झालं. शीमा यांना साडी नेसण्याची आवड त्यांच्या आईमुळेच लागली. सुरुवातीचं शिक्षण पाकिस्तानात घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शीमा लंडन येथे गेल्या. ब्रिटनमध्ये महिलांना मिळणारे अधिकार पाहून आपणही आपल्या देशात महिलांसाठी काही तरी करावं असं त्यांना वाटू लागलं.
१९८० च्या दशकात शीमा भरतनाट्यम नृत्य शिकण्यासाठी भारतात आल्या होत्या. हे भारतीय नृत्य शिकून त्या परत पाकिस्तानात गेल्या, त्यावेळी तिथे झिया उल हक यांचं सरकार होतं. पाकिस्तानात हिंदू रीतिरिवाजांवर त्यांनी बंदी घातली होती. भारतीय नृत्यालाही तिथे विरोध होता. एवढंच नाही, ‘गैर इस्लामिक’ म्हणून महिलांच्या साडी नेसण्यावरही तिथे प्रतिबंध आणले गेले होते; पण या कोणत्याही विरोधांना शीमा यांनी जुमानलं नाही. पाकिस्तानी महिलांवर निरंतर होत असलेले अत्याचार पाहून शीमा यांनी १९७० च्या दशकात ‘तहरीक-ए-निस्वां’ नावाचं महिला संघटन उभं केलं. दरवर्षीच्या ‘औरत मार्च’मध्येही त्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे हा गट आणि त्याच्याशी संबंधित महिला पाकिस्तानात नेहमीच कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर असतात.
पाकच्या बहुसांस्कृतिकतेला प्रोत्साहन
‘कोक स्टुडिओ’ हा प्रसिद्ध कार्यक्रम. शास्त्रीय, लोकसंगीतापासून ते सूफी, कव्वाली, गझल, भांगडा, हिप हॉप, रॉक, पॉप अशा असंख्य संगीत प्रभावांचा समावेश असलेल्या या कार्यक्रमाच्या पाकिस्तानातल्या आयोजनातही शीमा यांची भूमिका अतिशय कळीची आहे. २००८ पासून पाकिस्तानमधील सर्वांत जास्त काळ चालणारा हा वार्षिक संगीत कार्यक्रम आहे. पाकिस्तानच्या बहुसांस्कृतिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे.