पाकिस्तानात सरकारी बैठकीत फक्त चहा, बिस्कीटच मिळणार; पंतप्रधान, मंत्री पगार घेणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 05:33 AM2023-02-24T05:33:29+5:302023-02-24T07:48:11+5:30
सरकारी खर्च कपातीसाठी उचलली पावले, ३ प्रमुख कार उत्पादकांनी महिनाभरातच तीनवेळा कारच्या किमतीत वाढ केली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखी गडत हाेत असल्याची चिन्हे आहेत. सरकारने वीज, पाणी, गॅस,दूरध्वनी इत्यादींचे बिल मंत्र्यांनी स्वत:च्याच खिशातून भरण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर स्वत: पंतप्रधान आणि इतर मंत्री पगार घेणार नसल्याचे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी जाहीर केले आहे. आंतराष्ट्रीय नाणे निधीने पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी काही अटी ठेवल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम सरकारी खर्चावर कपात करण्यात येत आहे. सर्वसामान्य जनतेसाठीही यातून खर्च कमी करण्याबाबतचा एक संदेश आहे. ३ प्रमुख कार उत्पादकांनी महिनाभरातच तीनवेळा कारच्या किमतीत वाढ केली आहे. दुचाकींच्या किमतीतही माेठी वाढ झाली आहे.
खर्च कमी करण्यासाठी हे करणार
सरकारी लक्झरी वाहने जप्त करून लिलाव करणार
मंत्र्यांच्या अनावश्यक विमान प्रवासावर बंदी
गरज असल्यास इकाॅनाॅमी क्लासमध्ये करणार प्रवास
परदेशात पंचतारांकित हाॅटेल्समध्ये मुक्काम करता येणार नाही
सरकारी बैठकीत एक डिश आणि चहा-बिस्कीटच मिळणार
रात्री ८.३० वाजताच्या आत माॅल, मार्केट बंद.
सर्वांनाच बसला फटका
चीन, अमेरिका, भारत, जपान या देशांच्या तुलनेत पाकिस्तानातील कार उद्याेग खूपच लहान आहे. उच्चभ्रू लाेकांकडून महागड्या गाड्यांना जास्त मागणी राहते. त्यातुलनेत स्थानिक उत्पादकांना फार वाव राहत नाही. मात्र, वाढलेल्या किमतीचा सर्वांनाच माेठा फटका बसला आहे.
कार खरेदी करण्याचे स्वप्न पाकिस्तानात दिवास्वप्न ठरत आहे. दिवाळखाेरीच्या उंबरठ्यावर पाेहाेचलेल्या पाकिस्तानात थाेडीथाेडकी नव्हे तर १४९%नी कारच्या किमती वाढल्या आहेत. ही वाढ गेल्या पाच वर्षांमध्ये झाली आहे. पाकिस्तान बिझनेस फाेरमनुसार, २०१८ ते २०२३ या ५ वर्षांमध्ये कारच्या किमतीत १४९ टक्के एवढी वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तानी चलनाची अमेरिकन डाॅलरच्या तुलनेत माेठ्या प्रमाणावर झालेली घसरण. त्यात घसरण झाल्यास कार आणखी महाग हाेतील.