महिला म्हणताहेत, आई होणार नाही; वृद्धांनी आत्महत्या करावी, प्राध्यापकांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 11:39 AM2023-03-29T11:39:55+5:302023-03-29T11:40:07+5:30
जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत.
शांघाय : जगभरात सध्या ‘मॅरेज स्ट्राइक’ हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आहे. लग्नानंतर वाढणारी जबाबदारी टाळण्यासाठी महिला लग्न करण्यासह आई होण्यासाठी नकार देत आहेत. यामुळे चीन, जपान, दक्षिण कोरिया या देशांमध्ये जन्मदर प्रचंड घटला असून, वृद्धांची संख्या वाढली आहे. दक्षिण कोरियामध्ये परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की तिथे लहान मुलांसाठी बांधलेल्या शाळांचे आता नर्सिंग होममध्ये रूपांतर होत आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, ज्या शाळेत पूर्वी ७०० मुले असायची, तिथे आता फक्त चार मुले उरली आहेत.
येल विद्यापीठातील सहायक प्राध्यापक युसुके नारिता यांना जपानमधील वाढत्या वृद्धांच्या लोकसंख्येवर उपाय विचारला असता ते म्हणाले की, ‘यावर सोपा उपाय म्हणजे शेवटी वृद्धांनी सामूहिक आत्महत्या करावी. यावेळी त्यांनी १९व्या शतकातील ‘सेप्पुकू’ या विधीचे उदाहरण दिले. सेप्पुकू प्रथेनुसार, जपानमधील सामुराई वर्गातील लोक शरीरातील काही महत्त्वपूर्ण भाग काढून टाकून आपल्या प्राणांची आहुती देत असत.’
मुले का नकोत?
मुलांना जन्म दिल्यानंतर महिलांचे काम वाढते. आपली नोकरी सोडून द्यावी लागते. नोकरी असातानाही महिला पुरुषांच्या तुलनेत घरामध्ये जास्त वेळ काम करतात. गर्भधारणेनंतर नोकरीवरून काढून टाकले जाते.