ॲपल अन् गुगलच्या अंगणात मराठी माणसे विचारणार, ‘काय बे?’, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा मांडव सजला!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 06:20 AM2024-06-27T06:20:34+5:302024-06-27T06:20:52+5:30

तब्बल पन्नास लाख डॉलर्सचे ‘बजेट’; सहा हजार लोकांची उपस्थिती : सान होजेमध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा मांडव सजला!

In the courtyard of Apple and Google, Marathi people will ask | ॲपल अन् गुगलच्या अंगणात मराठी माणसे विचारणार, ‘काय बे?’, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा मांडव सजला!

ॲपल अन् गुगलच्या अंगणात मराठी माणसे विचारणार, ‘काय बे?’, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचा मांडव सजला!

सान  होजे : अमेरिकेत सान फ्रान्सिस्कोच्या कुशीतला  बे एरिया म्हणजे जग बदलून टाकणारी श्रीमंत, संपन्न भूमी! तिथे माउंटनव्ह्यू मधल्या गुगल प्लेक्सपासून चौदा मैलावर व कूपरटीनोतल्या ॲपल पार्कपासून आठ मैलावर  मंगळवारी दुपारी बुंदीचे आठ हजार लाडू वळले गेले... आंब्याच्या पानांची तोरणे लावायला सुरुवात झाली, ठेवणीतल्या पैठण्या-रेशमी कुर्त्यांची लगबग वाढली आणि  आणि ढोल-ताशा पथकाच्या सरावाचा आवाज घुमला... ॲपल, गुगल आणि मेटाच्या मुख्यालयांपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सान  होजे कन्व्हेन्शन सेंटरच्या भव्य वास्तूमध्ये उत्तर  अमेरिकेतल्या  बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या  अधिवेशनाचा बिगुल वाजला आहे.

  • स्थानिक वेळेनुसार गुरुवारी सकाळी या संमेलनाचा प्रारंभ होईल. ‘काय बे?’ असे मिश्कील घोषवाक्य असलेल्या भारताबाहेरच्या या सर्वात मोठ्या मराठी  संमेलनात मराठी कला, संस्कृती, परंपरा आणि पुरणपोळीपासून कडक चहापर्यंत खाण्यापिण्याची लयलूट असेल. 
  • तब्बल पन्नास लाख डॉलर्सचे बजेट असलेले हे आजवरचे सर्वात भव्य संमेलन जगभरातून आलेल्या सहा हजार प्रतिनिधींच्या उपस्थितीने गजबजून जाईल आणि जगप्रसिद्ध सिलिकॉन व्हॅलीमध्ये मराठी माणसांनी स्वकर्तृत्वाने कमावलेल्या सशक्त, श्रीमंत स्थानाची महती पुनश्च अधोरेखित होईल! 

सत्तरच्या दशकात अमेरिकेत येऊन पुढे स्वकर्तृत्वाने सिलिकॉन व्हॅलीवर अधिराज्य गाजवलेल्या   प्रकाश भालेराव यांच्यासारख्या ख्यातनाम ज्येष्ठ उद्योजकांपासून पंचविशीतल्या तरुण अभियंत्यांपर्यंत सर्व पिढ्यांमधली मराठी माणसे गेली दोन वर्षे या आयोजनासाठी झटत आहेत.

- सुमारे ३५० स्वयंसेवकांच्या ३० समित्या : दोन वर्षे अखंड काम 
- बे एरिया मराठी मंडळ, ईस्ट बे मराठी मंडळ, कला, स्वरसुधा, नाट्यसरगम, बसंत बहार, या स्थानिक संस्थांचे संयुक्त आयोजन 
- बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची धामधूम 

- राज ठाकरे, सुनील गावस्कर, अजय-अतुल यांच्यासह मान्यवरांचा सहभाग 
- ‘युवा कनेक्ट’मध्ये स्टार्टअप आयडिया ‘पीच’ होणार

Web Title: In the courtyard of Apple and Google, Marathi people will ask

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.