खायला अन्न घ्यावं की बाळासाठी डायपर ?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 09:04 AM2024-02-22T09:04:01+5:302024-02-22T09:08:33+5:30
दुकानाच्या बाहेर लग्नाचा मोहक पेहराव केलेल्या आकर्षक प्रतिमा ठेवलेल्या. अर्थातच हे दुकान नक्कीच लग्नाच्या पेहरावाचं असणार हे लगेच समजतं; पण दुकान कम शिवणकामाच्या वर्कशाॅपचा दरवाजा उघडून आत गेल्यावर मात्र एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं.
दुकानाच्या बाहेर लग्नाचा मोहक पेहराव केलेल्या आकर्षक प्रतिमा ठेवलेल्या. अर्थातच हे दुकान नक्कीच लग्नाच्या पेहरावाचं असणार हे लगेच समजतं; पण दुकान कम शिवणकामाच्या वर्कशाॅपचा दरवाजा उघडून आत गेल्यावर मात्र एक वेगळंच चित्र डोळ्यासमोर येतं. आतले कामगार सरसर पांढरं कापड कापत असतात. कापलेल्या दोन तुकड्यांच्या मधोमध कापूस ठेवून त्याच्या चारही बाजू मशीनवर शिवण्याच्या कामाची धांदल उडालेली असते. लग्नाचे कपडे शिवून देणारे डायपर कशाला शिवतील ? असा प्रश्न कोणालाही पडेल. ही वेळ आली ती युद्धजन्य परिस्थितीने निर्माण केलेल्या एका समस्येवर मार्ग काढण्यासाठी. छोटी बाळं असलेल्या पॅलेस्टिनी लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. गाझा पट्टीत डायपर ही दिलाशाची गोष्ट झाली आहे. कारण येथे निर्वासित झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांना जसं खायला अन्न मिळत नाहीये तसंच बाळांसाठी डायपरही मिळेनाशी झाली आहेत. या गंभीर समस्येवर पर्याय काढण्यासाठी म्हणूनच काही महिन्यांपूर्वी लग्नाचे पेहराव तयार करणाऱ्या दुकानांनी स्वस्त दरात डायपर उपलब्ध करून देण्यासाठी डायपर शिवण्याचं काम हाती घेतलं आहे.
डायपर ही गाझा पट्टीतील पॅलेस्टिनी लोकांची तीव्र गरज आहे. वर्कशाॅपमधील कामगारांना दिवस संपण्याच्या आत रोज ५०० डायपर शिवून ते पुठ्याच्या खोक्यात भरून विकण्यासाठी पाठवावे लागतात. दक्षिण गाझा पट्टीतील राफा शहरातलं हे शिवणकाम करणारं वर्कशाॅप आहे. मायसा कताती हे या वर्कशाॅपचे व्यवस्थापक. दिवसभर थांबून येथील कामगार जे डायपर बनवतात ते प्रत्यक्षातली फारच तोकडी गरज पूर्ण करू शकणार आहेत, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे; पण अवघड परिस्थितीत तेवढाच दिलासा आणि जगण्याचा प्रश्न गंभीर झालेल्या या भागातल्या अनेक लोकांना हे वर्कशाॅप डायपर शिवण्याच्या कामातून रोजगार मिळवून देत आहे.
तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहणारे निर्वासित पॅलेस्टिनी पुरुष आपल्या लहान मुलांसाठी डायपर विकत घेण्यासाठी बाजारात दिवसभर रांगा लावतात आणि शेवटी अतिशय महाग आणि तेही एखाद दुसरं डायपर विकत घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. निर्वासित पॅलेस्टिनींना अन्नासोबतच आता डायपरसाठीही संघर्ष करावा लागतो आहे. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यांनी गाझा पट्टीतील २३ लाख नागरिक निर्वासित झाले आहेत. राफा येथे निर्वासितांनी आश्रय घेतला असून, या भागातील इमारती, तंबू माणसांनी खचाखच भरून गेले आहेत. खायला पुरेसे अन्न नाही, प्यायला पाणी नाही, स्वच्छता आणि सुरक्षेची गंभीर परिस्थिती, त्यातच डायपरचाही तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, त्यामुळे लहान मुलांचे आई बाबा हवालदिल झाले आहेत. डायपरच्या टंचाईने आज राफामधील १५ लाख लोक मेटाकुटीला आले आहेत. जिथे टंचाई तिथे महागाई या न्यायाने डायपरचे भाव गगनाला भिडले आहेत. आठ डायपर असलेल्या एका पॅकेटची किंमत २०० शेकेल्स (५५ डाॅलर्स) इतकी झाली आहे. एक डायपर दीड डाॅलरला मिळतं. जिथे भूक भागवण्यासाठी अन्न घ्यायला पैसे नाही तिथे डायपरसाठी पैसे कुठून आणणार? लोकांना स्वस्तात डायपर उपलब्ध करून देण्यासाठी लग्नाचे पेहराव तयार करणाऱ्या दुकानांनी कोविड १९ काळात मास्क वगैरे तयार करण्यासाठी जे कापड वापरलं होतं ते वापरून डायपर तयार केले आहे. बाजारातील किमतीपेक्षा या वर्कशाॅपमध्ये तयार होणारे डायपर १० पट स्वस्त आहेत. हे डायपर फक्त लहान मुलांनाच लागतात असं नाही तर वयस्कर आणि अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांनाही डायपर मोठ्या प्रमाणावर लागतात.
निर्वासित लोक छावण्यांमध्ये राहत आहेत. गर्दी आणि पाण्याचा अभाव यामुळे लहान मुलांना स्वच्छ ठेवणं अवघड जात आहे. पॅलेस्टिनी महिला वापरात नसलेल्या शाॅर्टस, खराब कपडे आणि किराणा दुकानात मिळणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून तात्पुरती सोय करत आहेत; पण त्यामुळे लहान बाळं मात्र सतत अस्वस्थ असतात.. हॅनी सुब एक निर्वासित पॅलेस्टिनी पिता. तो रोज उठून बाजारात जातो, डायपरचा शोध घेतो. जिथे कुठे डायपर उपलब्ध असतं ते घेणं त्याला परवडणारं नसतं आणि डायपर घेण्यावाचून त्याच्याकडे दुसरा पर्यायही नसतो. अशा वेळेस खायला अन्न घ्यावं की मुलांसाठी डायपर, असा प्रश्न त्याला पडतो ! त्याच्या या प्रश्नाचं उत्तर कोण देणार?
आता डायपरसाठी घ्यावं लागेल कर्ज !
गाझा पट्टीतील निर्वासित लोकांची अवस्था दयनीय झाली आहे. जितकी त्यांना आज अन्नाची गरज आहे तितकीच डायपरचीही आहे. दोन्ही घेण्यासाठी हातात पैसे नाहीत,अशी परिस्थिती. म्हणून गाझा पट्टीतील बँका जेव्हा केव्हा उघडतील तेव्हा डायपर घेण्यासाठी कर्ज हवं म्हणून येथील लोकं बँकांमध्ये रांगा लावतील, अशी (गंभीर) चर्चा सध्या सुरू आहे. एक युद्ध किती आणि कोणते प्रश्न निर्माण करणार, हे त्या नियतीलाच ठाऊक !