अमेरिकेतील घटनेने पोलीसही चक्रावला; मोटारीचा ‘ड्रायव्हर’ अवघ्या पाच वर्षांचा!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 11:48 PM2020-05-06T23:48:23+5:302020-05-06T23:48:53+5:30
आईने वाहनाला दिला होता नकार
लॉस एंजल्स : उटाह या अमेरिकेच्या पश्चिमेकडील राज्यातील महामार्गावर गेल्या सोमवारी लेनची शिस्त मोडून नागमोडी पद्धतीने जाणारी एक आलिशान मोटार शिटी वाजवून थांबविली असता ती मोटार चक्क पाच वर्षांचा मुलगा चालवत असल्याचे पाहून गस्त घालणारा पोलीसही चक्रावून गेला.
उटाह राज्याच्या हायवे पॅट्रोल पोलिसांनी या धक्कादायक घटनेची माहिती टिष्ट्वटरवर दिली व त्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये सुरुवातीस नागमोडी जााणाऱ्या एका ‘एसयूव्ही’ मोटारच्या बाजूने इतर अवजड वाहने वेगाने पुढे निघून जात असल्याचे दिसते. नंतर गस्त घालणाºया पोलिसांनी शिटी वाजविल्यावर ती रस्त्याच्या डाव्या बाजूला थोड्या अंतरावर जाऊन थांबते. थोड्याच वेळात तो शिटी वाजविणारा पोलीस मोटारीजवळ येतो व ही धक्कादायक बाब उघड होते.
या मुलाने सांगितलेली जी ‘स्टोरी’ उटाह हायवे पॅट्रोलने टिष्ट्वटरवर टाकली ती तर आणखीच अचंबित करणारी आहे. त्यात पोलिसांनी या मुलाचे नाव उघड केलेले नाही व व्हिडिओतही त्याचा चेहरा स्पष्ट दिसणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे. या मुलाला ‘लॅम्बॉर्गिनी’ कंपनीची अतिमहाग व आलिशान मोटार हवी होती. ती देण्यास आईने नकार दिला दिला म्हणून तो नाराज होता. सोमवारी आई-वडील दोघेही कामासाठी बाहेर गेल्यानंतर हा मुलगा व त्याचा मोठा भाऊ, असे दोघेच घरात होते. भाऊ झोपला आहे, हे पाहून त्याने स्वत:च शोरूममध्ये जाऊन ‘लॅम्बॉर्गिनी’ आणण्याचे ठरविले. पैशाचे पाकीट रुबाबात खिशात कोंबत हे महाशय घराबाहेर पडले.
एसयूव्ही कार विकत घेण्यासाठी मुलाच्या पाकिटात होते तीन डॉलर
3-4 कि.मी. घरापासून चालवत त्याने मोटार हायवेवर आणली आणि गस्त घालणाºया पोलिसाने त्याला थांबविले. पोलिसांनी तपासणी केली असता पाकिटात तीन डॉलर घेऊन हा मुलगा रुबाबात ‘लॉम्बॉर्गिनी’ आणण्यासाठी निघाला होता, असे निष्पन्न झाले. या घटनेत कोणताही अपघात झाला नाही. वडिलांची एक ‘एसयूव्ही’ मोटार गॅरेजमध्ये उभी होती. घराच्या व्हरांड्यात इतर चाव्यांच्या जुडग्यांसोबत हुकाला अडकविलेली चावी घेऊन या मुलाने गॅरेजमधील ‘एसयूव्ही’ बाहेर काढली.