इसिसच्या हल्ल्यांत वाढ
By admin | Published: October 23, 2015 03:48 AM2015-10-23T03:48:16+5:302015-10-23T03:48:16+5:30
इस्लामिक स्टेटच्या (इसिस) जगभरातील हिंसाचारात अलीकडे प्रचंड वाढ झाली आहे. या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने गेल्या तीन महिन्यांमध्ये एक हजार हल्ले
लंडन : इस्लामिक स्टेटच्या (इसिस) जगभरातील हिंसाचारात अलीकडे प्रचंड वाढ झाली आहे. या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने गेल्या तीन महिन्यांमध्ये एक हजार हल्ले केले असून त्यात तीन हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. आयएचएस जेनस् या विश्लेषण प्रतिष्ठानाने गुरुवारी ही माहिती दिली.
या जिहादी संघटनेच्या दररोजच्या हल्ल्यात ४२ टक्के वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. इसिसचे जुलै ते सप्टेंबर महिन्यादरम्यान दररोजच्या हल्ल्यांचे प्रमाण ११.८ होते, तर तत्पूर्वी एप्रिल ते जूनदरम्यान हेच प्रमाण ८.३ होते. आकडेवारीवरून अमेरिकाप्रणीत हवाई हल्ल्यांचा इसिसवर फार थोडा परिणाम झाल्याचे दिसते. लंडन येथील या विश्लेषण प्रतिष्ठानाच्या नोंदीनुसार इसिसने या काळात १०८६ हल्ले केले व त्यात २,९७८ लोक मृत्युमुखी पडले. मृतांत सामान्य नागरिक व सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
इसिसच्या हल्ल्यांमुळे दररोज होणाऱ्या जीवितहानीच्या प्रमाणात आधीच्या तिमाहीच्या तुलनेत या तीन महिन्यांत ६५.३ टक्के एवढी प्रचंड वाढ झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ ८१ टक्के आहे. आयएचएस जेनस्ने खुल्या स्रोतांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही आकडेवारी तयार करण्यात आली आहे. इसिसने याहून कितीतरी अधिक हल्ले केले असण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची खातरजमा होऊ शकली नाही.
या आकडेवारीत नायजेरियाच्या बोको हराम संघटनेचे हल्ले आणि त्यातील जीवितहानीचा समावेश आहे. बोको हरामने मार्चमध्ये आपण इसिसशी संलग्नित असल्याचे घोषित केले होते. (वृत्तसंस्था)