पाकमध्ये बिगरमुस्लिमांच्या संख्येत वाढ, निवडणूक आयोगाची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 05:24 AM2018-05-29T05:24:08+5:302018-05-29T05:24:08+5:30
पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्यासाठी नवीन मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाकिस्तानात बिगरमुस्लीम मतदारांत पाच वर्षांत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे.
इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये २५ जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्यासाठी नवीन मतदारयाद्या तयार करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पाकिस्तानात बिगरमुस्लीम मतदारांत पाच वर्षांत तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यांची संख्या ३६.३ लाख झाली आहे. त्यात हिंदू मतदारांची संख्या सर्वाधिक म्हणजे १७.७ लाख आहे.
पाकिस्तानातील धार्मिक अल्पसंख्यांक मतदारांची संख्या २०१३च्या निवडणुकांच्या वेळी २७.७ लाख व त्यातील हिंदू मतदारांची संख्या १४ लाख होती. बहुतांशी हिंदू सिंध प्रांतात राहतात. ख्रिश्चन मतदारांची संख्या १६.५४ लाख आहे. त्यातील १0 लाख ख्रिश्चन पंजाब, तर दोन लाख सिंध प्रांतात राहतात. पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी आहे. त्यातील सुमारे १0 कोटी ६0 लाख लोक मतदार असून ५.९२ कोटी पुरुष व ४.६७ कोटी स्त्री मतदार आहेत. पाकिस्तानात शीख मतदार ८८४२ तर पारसी मतदार ४२३५ आहे. भारतात पारसी समाजाची लोकसंख्या सातत्याने घटत असताना पाकिस्तानात मात्र पाच वर्षांत ती सुमारे ९00 ते वाढली आहे. (वृत्तसंस्था)
सध्या सत्तेवर असलेल्या पाकिस्तान मुस्लिम लिग-नवाझ गट (पीएमएल-एन) या पक्षाच्या सरकारचा कार्यकाळ ३१ मे रोजी संपत होत असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल लागून सत्तांतर होईपर्यंत काळजीवाहू सरकार देशाचा कारभार पाहील.
भारताची भूमिका पाकला अमान्य
गिलगिट-बाल्टिस्तान भागातील स्थानिक प्रशासनाचे अधिकार कमी करण्याच्या पाकिस्तानचे पंतप्रधान शाहिद खकन अब्बासी यांच्या निर्णयाबद्दल भारताने निषेध व्यक्त करून त्या देशाला खडसावले होते. भारताची ही भूमिका आपल्याला मान्य नसल्याचे पाकने म्हटले आहे.