Independence Day: 14 ऑगस्टनंतर पाकिस्तानचे काय झाले?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 01:38 PM2018-08-14T13:38:03+5:302018-08-14T13:39:03+5:30
भारत आणि पाकिस्तान हे दोन देश तयार झाले खरे, पण पाकिस्तानात राजकीय स्थैर्य कधीच आले नाही.
मुंबई- भारताची विभागणी करुन 14 ऑगस्ट रोजी दोन देश नव्याने उदयाला आले खरे परंतु त्यानंतर पाकिस्तानने राजकीय वाटचाल कशी केली याबाबत आपल्याला फारशी माहिती नसते. भारताने संसदीय लोकशाही स्वीकारून एक कायदेशीर नियमबद्ध राजकीय व्यवस्था सुरळीत ठेवली. मात्र पाकिस्तानात असे झाले नाही. राजकीय अस्थैर्य आणि पाकिस्तान यांचे समिकरण अजूनही तितकेच घट्ट आहे.
1947 पासून पाकिस्तानी जनतेचे निम्मे आयुष्य लष्करी अधिपत्याखाली गेले आहे. पाकिस्तानच्या राजकीय इतिहासातील काही महत्त्वाचे दिवस असे आहेत...
14 ऑगस्ट- 1947- मुस्लीम लीगचे नेते मबहंमद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनल म्हणून नेमले गेले. लियाकत अली खान पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान झाले.
16 ऑक्टोबर 1951 या दिवशी लियाकत अली खान यांची हत्या करण्यात आली. लियाकत अली खान यांनी पाकिस्तानच्या राज्यघटनेची प्रस्तावना लिहिली होती.
1951-1954 या कालावधीत सतत पंतप्रधान बदलले गेले.
23 मार्च 1956 इस्कंदर मिर्झा यांनी गव्हर्नर जनरल सर मलिक गुलाम यांना पदच्युत करुन पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. तसेच मिर्झा यांनी पाकिस्तानच्या पहिल्या राज्यघटनेला मान्यता दिली.
7 ऑक्टोबर 1958 रोजी मिर्झा यांनी मार्शल लॉ पुकारला.
27 ऑक्टोबर 1958 जनरल अयुब यांनी मिर्झा यांना पदच्युत करुन लष्करी बंड केले
2 जानेवारी 1965 अयुब खान पुन्हा एकदा पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडले गेले. या निवडणुकीत अनेक घोटाळे झाल्याचा आरोप केला जातो.
25 मार्च 1969- अयुब खान यांनी सर्व सत्तासूत्रे लष्करप्रमुख याह्या खान यांच्याकडे दिली.
7 डिसेंबर 1970- पूर्व पाकिस्तानातील अवामी लिग पक्षाचा विजय झाला. संपूर्ण पाकिस्तानात वातावरण अस्थिर झाले.
26 मार्च 1971- भारत आणि पाकिस्तान युद्धात पाकिस्तानचा सपाटून पराभव झाला. बांगलादेश वेगळा झाल्यानंतर मार्शल लॉचे प्रशासक म्हणून झुल्फिकार अली भूट्टो काम पाहू लागले.
20 डिसेंबर 1971- झुल्फिकार अली भूट्टो राष्ट्राध्यक्ष झाले.
14 ऑगस्ट 1973 नवी राज्यघटना स्वीकारण्यात आली. सर्व अधिकार पंतप्रधानांकडे देण्याचा निर्णय झाल्यावर पंतप्रधानपदी भूट्टो नेमले गेले व राष्ट्राध्यक्षपदी फजल इलाही यांची नेमणूक झाली.
7 मार्च 1977- भूट्टो यांचा पक्ष पुन्हा विजयी झाला.
5 जुलै 1977- जनरल झिया उल हक यांनी भुट्टोंना पदच्युत केले व त्यांना अटक केली.
4 एप्रिल 1979 झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी देण्यात आली.
28 फेब्रुवारी 1985 झिया उल हक राष्ट्राध्यक्ष तर मोहंमद खान जुनेजो पंतप्रधान झाले.
17 ऑगस्ट 1988 झिय़ा उल हक विमान अपघातात मृत्युमुखी पडले.
16 नोव्हेंबर बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पहिला महिला पंतप्रधान झाल्या.
6 ऑगस्ट 1990 राष्ट्राध्यक्ष गुलाम इशक खान यांनी बेनझीर यांचे सरकार बरखास्त केले.
24 ऑक्टोबर 1990 नवाज शरीफ पंतप्रधानपदी आले.
19 एप्रिल 1990 गुलाम इशक खान यांनी शरीफ सरकारही बरखास्त केले.
6 ऑक्टोबर 1993 बेनझीर भुट्टो पुन्हा पंतप्रधानपदी निवडल्या गेल्या.
14 नोव्हेंबर फारुख लेघारी राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त
5 नोव्हेंबर 1996 लेघारी यांनी बेनझीर सरकार बरखास्त केले.
3 फेब्रुवारी 1997 पुन्हा एकदा शरीफ पंतप्रधानपदी निवडले गेले.
12 ऑक्टोबर 1999 सरकार बरखास्त करुन लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्या हाती सत्ता आली.
20 जानेवारी 2001 परवेझ मुशर्रफ राष्ट्राध्यक्षपदी नियुक्त
10 ऑक्टोबर 2002 जफरुल्लाह खान जमाली पंतप्रधानपदी निवडले गेले.
28 ऑगस्ट 2004 शौकत अजिझ पंतप्रधानपदी नियुक्त
27 डिसेंबर 2007 बेनझीर भूट्टो यांची बॉम्बहल्ल्यात हत्या करण्यात आली.
18 फेब्रुवारी 2008 युसुफ रझा गिलानी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडले गेले.
6 सप्टेंबर 2008 असिफ अली झरदारी पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडले गेले.
22 जून 2012 रजा परवेज अश्रफ पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवडले गेले.
11 मे 2013 नवाज शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवडले गेले.
1 ऑगस्ट 2017 रोजी शाहिद कान अब्बासी पंतप्रधानपदी नियुक्त
25 जुलै 2018 पाकिस्तानात निवडणुका घेण्यात आल्या. क्रिकेटर इम्रान खान पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल.