UNGA : पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावर भारताची मोठी खेळी, 'या' देशांनी ठरावाच्याविरोधात केलं मतदान!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 12:51 PM2024-09-19T12:51:12+5:302024-09-19T12:52:01+5:30
UNGA : १२४ देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.
UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत (UNGA) भारतानं पॅलेस्टाईनशी संबंधित ठरावावर मतदान करण्यापासून अलिप्त राहणं पसंत केलं आहे. इस्रायलनं पॅलेस्टाईनच्या क्षेत्रावर जो बेकायदा ताबा मिळवला आहे. तो लवकरात लवकर हटवावा आणि तोही १२ महिन्यांत कोणताही विलंब न लावता, अशी मागणी या ठरावात करण्यात आली आहे. भारतानं या ठरावावर मतदान केलं नाही. १२४ देशांनी या ठरावाच्या बाजूनं मतदान केलं.
या ठरावाच्या विरोधात १४ देशांनी मतदान केलं. यात इस्रायल, अमेरिका हे देश आहेत. तर भारतासह ४३ देशांनी मतदानात सहभागच घेतला नाही. भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी, इटली, नेपाळ, युक्रेन आणि ब्रिटन हे देश मतदानापासून लांब राहिले. इस्रायलनं बेकायदेशीर पॅलेस्टाईनचा जो भूभाग आपल्या ताब्यात घेतला आहे, तो १२ महिन्याच्या आत परत करावा, असा ठराव बुधवारी मंजूर करण्यात आला होता. ताब्यात असलेल्या पॅलेस्टाईन प्रदेशाबाबत आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कोणत्याही उल्लंघनासाठी इस्रायलला जबाबदार धरले पाहिजे, असेही ठरावात म्हटले होते.
दरम्यान, पॅलेस्टाईनकडून तयार केलेला या ठरावात इस्त्रायली सरकारद्वारे संयुक्त राष्ट्र चार्टर, आंतरराष्ट्रीय कायदा आणि संयुक्त राष्ट्रांच्या संबंधित ठरावांनुसार आपल्या दायित्वांकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं आहे आणि यासाठी त्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. यासोबतच, अशा उल्लंघनांमुळे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होतो, यावरही भर देण्यात आला.
ठरावाच्याविरोधात मतदान करणारे देश
- अमेरिका
- इस्रायल
- अर्जेंटिना
- चेक रिपब्लिक
- फिजी
- हंगेरी
- मलावी
- माइक्रोनीशिया
- नौरू
- पलाउ
-पापुआ न्यू गिनी
- प्राग
- टॉन्गा
-टुवालू