बांगलादेशपाठोपाठ ब्रिटनमध्ये हिंसाचार, भारतीयांच्या सुरक्षेबाबत सरकार सतर्क, मार्गदर्शक सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:00 PM2024-08-06T17:00:38+5:302024-08-06T17:01:14+5:30
भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
सध्या भारताच्या शेजारील बांगलादेशातील परिस्थिती नियंत्रणात नाही. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर येथील सत्ता लष्कराच्या हाती गेली. तरीही देशातील व्यवस्था मोडकळीस आली असून सर्वत्र हिंसाचार पसरला आहे. बांगलादेशात एकीकडं तणाव असताना दुसरीकडं लंडनमध्येही परिस्थिती सामान्य नाही, तिथंही हिंसाचार उसळला आहे. त्यामुळं लंडनमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सरकारने ॲडव्हायजरी म्हणजेच मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
बांगलादेशप्रमाणं लंडनमध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार चालू आहे. देशाच्या अनेक भागांमधून हिंसक घटना समोर येत आहेत. साऊथपोर्टमध्ये एका डान्स क्लासमध्ये झालेल्या चाकूहल्ल्याच्या घटनेनंतर अनेक ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. साऊथपोर्टमध्ये झालेल्या चाकूहल्ल्यात तीन तरुणींचा मृत्यू झाला होता, तर अनेकजण जखमी झाले होते. त्यानंतर झालेल्या हिंसक घटनांप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १०० हून अधिक आरोपींना अटक केली आहे.
बुधवारी ३१ जुलै रोजी, हजारो लोक लंडनमधील पंतप्रधानांच्या डाऊनिंग स्ट्रीट निवासस्थानाजवळ जमले आणि त्यांनी स्थलांतरितांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. आमच्या मुलांना वाचवा, आम्हाला आमचा देश परत हवा आहे आणि स्थलांतर थांबवा अशा घोषणा जमलेल्या लोकांनी दिल्या. यानंतर भारत सरकार आपल्या नागरिकांच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे. भारत सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहत असून त्यांनी खबरदारीचे उपाय योजले आहेत. तसंच भारत सरकारने ब्रिटनला जाणाऱ्या नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
लंडनमध्ये हिंसाचार पसरल्यानंतर भारत सरकार सतर्क झाले आहे. लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांनी सूचना जारी करताना म्हटलं आहे की, ब्रिटनमधील काही भागांत हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय लोकांनी ब्रिटनमध्ये रस्त्यावर फिरताना सावधगिरी बाळगली पाहिजे. तसंच, ज्या भागात आंदोलनं सुरू आहेत, त्यापासून दूर राहावं. यासोबतच भारतीय उच्चायुक्तालय या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. परंतु, येथील सद्यस्थिती पाहता भारतातून ब्रिटनला येणाऱ्या प्रवाशांना आम्ही सल्ला देत आहोत की, त्यांनी ब्रिटनला येताना, इथे राहत असताना सतर्क राहावं आणि सावधानता बाळगावी.
दरम्यान, अलीकडेच ब्रिटनमध्ये लिवरपूल, हल, ब्रिस्टल, लीड्स, ब्लॅकपूल, स्टोक-ऑन-ट्रेंट, बेलफास्ट, नॉटिंघम व मॅन्चेस्टरमध्ये दगडफेकीच्या घटना पाहायला मिळाल्या आहेत. अनेक ठिकाणी फटाक्यांद्वारे स्फोट घडवण्यात आले. देशात आलेले शरणार्थी ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलच्या खिडक्या फोडण्यात आल्या आहेत. कित्येक दुकानांवर हल्ले झाले आहेत. अनेक दुकानं व वाहनांना आग लागवण्याचे प्रकार समोर येत आहेत. जमाव व पोलिसांमध्ये अनेक चकमकी घडल्या आहेत. यात काही पोलिस व नागरिक जखमी झाले आहेत.
बांगलादेशमध्ये मार्गदर्शक सूचना जारी
बांगलादेशातील हिंसाचारामुळे सुद्धा भारतीय लोकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या २०२४ च्या रिपोर्टनुसार बांगलादेशात जवळपास सात हजार भारतीय राहतात. भारतानं नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा आणि शेजारच्या देशात हालचाली मर्यादित करण्याचा सल्ला दिला. इमरजन्सी नंबर देखील जारी केला आहे.