दोस्त दोस्त ना रहा? जुन्या मित्राचा भारताला ठेंगा; चीन, पाकिस्तानाला मानाचं आमंत्रण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2021 10:52 AM2021-08-06T10:52:34+5:302021-08-06T10:55:07+5:30
अफगाणिस्तान प्रश्नावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या बैठकीचं भारताला निमंत्रण नाही
मॉस्को: अमेरिकनं सैन्य मायदेशी परतल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती वेगानं बिघडत चालली आहे. तालिबानी दहशतवादी पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी अक्षरश: हैदोस घातला आहे. या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रशियानं एक बैठक बोलावली. या बैठकीला भारताला आमंत्रित करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे याच बैठकीला चीन, पाकिस्तान या भारताच्या शत्रू राष्ट्रांना निमंत्रित करण्यात आलं आहे. कतारमध्ये विस्तारिका ट्रोइका नावानं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रशियानं याआधीही एक बैठक बोलावली होती. त्या बैठकीलाही भारताला निमंत्रित करण्यात आलं नव्हतं. विशेष म्हणजे रशिया भारताचा जुना मित्र समजला जातो. दोन्ही देशांमध्ये होणारा व्यापार मोठा आहे. भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची खरेदी करतो. दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक संबंध असताना रशियानं अफगाणिस्तान प्रश्नावर चर्चा करण्यासाठी भारताला बोलावलेलं नाही. भारताची अफगाणिस्तानमध्ये मोठी गुंतवणूक आहे. कोट्यवधींचे प्रकल्प सुरू आहेत. त्यामुळे अफगाणिस्तान प्रश्न भारतासाठी महत्त्वाचा आहे.
अफगाणिस्तानातील स्थितीवर चर्चा करण्यासाठी होणारी विस्तारिक ट्रोइका बैठक ११ ऑगस्टला प्रस्तावित आहे. कतारची राजधानी दोह्यात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. याआधी रशियानं १८ मार्च आणि ३० एप्रिललादेखील अशाच प्रकारच्या बैठका बोलावल्या आहेत. मात्र त्यावेळीही भारताला आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. 'अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी रशिया भारत आणि अन्य देशांसोबत काम करेल,' असं रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी गेल्या महिन्यात म्हटलं होतं. त्यामुळे रशियाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या बैठकीला भारताला आमंत्रित करण्यात येईल अशी अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे.