भारत, चीनमध्ये अमेरिकेपेक्षाही जास्त कोरोना रुग्ण सापडतील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2020 02:48 AM2020-06-07T02:48:53+5:302020-06-07T02:49:14+5:30
डोनाल्ड ट्रम्प; वैद्यकीय चाचण्यांची संख्या वाढवण्याची सूचना
वॉशिंग्टन : भारत व चीनने अधिकाधिक वैद्यकीय चाचण्या केल्या तर त्या देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण अमेरिकेपेक्षा जास्त प्रमाणात सापडतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, अमेरिकेने आतापर्यंत कोरोनाच्या २ कोटी चाचण्या केल्या आहेत. जर्मनीने ४० लाख तर दक्षिण कोरियाने तीस लाख चाचण्या केल्या आहेत. भारताने आतापर्यंत कोरोनाच्या चाळीस लाखांहून अधिक चाचण्या केल्या.
जॉन्स हॉपकिन्स कोरोना व्हायरस रिसोर्स सेंटरने म्हटले आहे की, अमेरिकेत कोरोनाचे १९ लाखांहून अधिक रुग्ण आढळले असून, या आजारामुळे तिथे बळी गेलेल्यांची संख्या १ लाख ११ हजारांवर पोहोचली आहे. कोरोनाच्या साथीचा सर्वात मोठा फटका अमेरिकेला बसला आहे. भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या २ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त झाली असून, चीनमध्ये हा आकडा ८३ हजारांपेक्षा अधिक झाला आहे.
या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, कोरोनाच्या चाचण्या जेवढ्या जास्त संख्येने होतील तेवढे अधिकाधिक रुग्ण सापडत जातील. भारत व चीनमध्ये चाचण्यांचे प्रमाण वाढविले तर तिथेही कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून येईल. अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा या साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उत्तम काम करत आहे. स्वॅब घेण्याची सामुग्री बनविणाऱ्या प्युरिटन या अमेरिकी कंपनीच्या कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, प्युरिटन कंपनी अतिशय उच्च दर्जाची स्वॅब साधने निर्माण करत आहे. त्यामुळे कोरोनाचे झपाट्याने निदान होण्यास मोठी मदत झाली आहे. (वृत्तसंस्था)