आता बासमतीवरून संघर्ष पेटला; भारताच्या आक्रमक हालचालींनी पाकिस्तान मेटाकुटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 10:46 AM2021-06-09T10:46:02+5:302021-06-09T10:47:18+5:30
बासमती तांदळाला विशेष ट्रेडमार्क मिळावा यासाठी भारताची आक्रमक भूमिका
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये आता बासमती तांदळावरून संघर्ष पेटला आहे. दोन्ही देशांच्या खाद्य संस्कृतीत बासमती तांदळाला विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय पुलाव आणि बिरयानीची कल्पनादेखील करता येत नाही. मात्र आता याच बासमतीवरून भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. बासमती तांदळाला विशेष ट्रेडमार्क (पीजीआय) मिळावा यासाठी भारतानं युरोपियन युनियनकडे अर्ज केला आहे.
युरोपियन युनियननं बासमती तांदळाचा विशेष ट्रेडमार्क भारताला दिल्यास पाकिस्तानला मोठा आर्थिक फटका बसेल. त्यामुळेच पाकिस्ताननं विरोध सुरू केला आहे. भौगोलिक प्रदेशात येणाऱ्या विशिष्ट उत्पादनांना पीजीआय दर्जा मिळतो. विशिष्ट वस्तूचं उत्पादन, त्यावरील प्रक्रिया किंवा तयारी याबद्दलचा किमान एक टप्पा पूर्ण होत असलेल्या ठिकाणांना पीजीआय दर्जा दिला जातो. दार्जिलिंगमधील कॉफीसाठी भारताला पीजीआय दर्जा मिळाला आहे. कोलंबियातील कॉफीला पीजीआय दर्जा प्राप्त आहे.
मित्र छोटा, पण दणका मोठा; पदड्याआडून हालचाली घडवत भारताचा पाकिस्तानला दे धक्का
पीजीआय दर्ज्याचे अनेक फायदे आहेत. पीजीआय दर्जा प्राप्त उत्पादनांची नक्कल केल्यास कायदेशीर संरक्षण मिळतं. या उत्पादनांची बाजारातील किंमतही अधिक असते. त्यामुळेच भारतानं पीजीआय दर्जासाठी अर्ज करताच पाकिस्तान मेटाकुटीला आला आहे. बासमती तांदूळ निर्यात करणारे जगात दोनच देश आहेत. संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक तांदूळ निर्यात करणाऱ्या देशांच्या यादीत भारत प्रथम स्थानी आहे. तांदूळ निर्यातीतून भारताला ६.८ अब्ज डॉलर इतकं उत्पन्न मिळतं. या यादीत पाकिस्तान चौथ्या स्थानी आहे. तांदूळ निर्यातीतून पाकिस्तान २.२ अब्ज डॉलर्सची कमाई करतो. त्यामुळेच बासमतीसाठी पीजीआय दर्जा मिळवण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पाकिस्तानचा विरोध आहे.