भारत, बांगलादेशात पावसाचे ६०० बळी; २.५ कोटी लोकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2019 01:18 AM2019-07-28T01:18:14+5:302019-07-28T01:18:26+5:30
बांगलादेशमध्ये पुरामुळे ४० लाख लोकांना फटका बसला आहे.
संयुक्त राष्ट्रे : भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या पुरात ६०० लोकांचा मृत्यू झाला, तर २.५ कोटी लोकांना या पुराचा फटका बसला आहे. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुतारेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी सांगितले की, या पुरामुळे पाच लाखांपेक्षा अधिक लोक विस्थापित झाले आहेत.
हक यांनी सांगितले की, भारत, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमारमध्ये काही भागांत मुसळधार पावसाने पूर आला आहे. यामुळे अडीच कोटी लोक विस्थापित झाले आहेत. भारतात आसाम, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये युनिसेफ राज्य सरकारांच्या मदतीने समन्वयासाठी प्रयत्न करीत आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने म्हटले आहे की, नुकसान झालेले रस्ते, पूल आणि रेल्वे ट्रॅक यामुळे अनेक भागांत अद्याप पोहोचणे शक्य होत नाही. मुलांसाठी सर्वात मोठी गरज स्वच्छ पाणी, आजार रोखण्यासाठीच्या वस्तू, खाद्यपदार्थांचा पुरवठा आणि विस्थापित ठिकाणी मुलांसाठी स्वच्छ जागा हे आवश्यक आहे. भारतात आसाम, बिहार, उत्तर प्रदेशच्या काही भागांत आणि अन्य पूर्वोत्तर राज्यांत एक कोटीपेक्षा अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. यात ४३ लाख मुले आहेत. पुरामुळे परिस्थिती आणखी बिघडली, तर या आकड्यांमध्ये वाढ होऊ शकते. एकट्या आसाममध्ये पुरामुळे जवळपास २००० शाळांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)
तीन देशांत ९३ मुलांचा मृत्यू
बांगलादेशमध्ये पुरामुळे ४० लाख लोकांना फटका बसला आहे. म्यानमारमध्ये पुरामुळे ४० हजार लोक विस्थापित झाले आहेत. मागील आठवड्यात संयुक्त राष्ट्रांच्या चिल्ड्रन एजन्सीने युनिसेफने सांगितले होते की, नेपाळ, भारत आणि बांगलादेशात पुरामुळे ९३ मुलांचा मृत्यू झाला आहे.