संयुक्त राष्ट्रात चीनला मोठा धक्का! ECOSOCचा सदस्य बनला भारत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:06 AM2020-09-15T10:06:44+5:302020-09-15T10:07:01+5:30
संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
भारताने पुन्हा एकदा चीनला धक्का दिला आहे. चीनला पराभूत करीत आर्थिक आणि सामाजिक परिषद (ECOSOC) संघटनेच्या संयुक्त राष्ट्रांच्या महिलांच्या स्थिती विषयक आयोगाचा सदस्य म्हणून भारत निवडला गेला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली.
टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, प्रतिष्ठित ECOSOC संघटनेत भारताने जागा मिळवली आहे. भारताची महिलांच्या स्थिती आयोगाच्या (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड झाली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणास प्रोत्साहित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे महत्त्वपूर्ण समर्थन आहे. आम्ही सदस्य देशांचे त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानतो. भारत, अफगाणिस्तान आणि चीनने महिलांच्या स्थिती आयोगासाठी निवडणूक लढविली होती.
यामध्ये भारत आणि अफगाणिस्तानने 54 सदस्यांसह निवडणूक जिंकली, तर चीनला पराभवाचा सामना करावा लागला. चीनला निम्मी मतेही जमवता आली नाहीत. बीजिंग वर्ल्ड कॉन्फरन्स वूमन(1995)चे हे 25वे वर्षं आहे. यानिमित्ताने चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर भारत आता चार वर्ष या आयोगाचा सदस्य असेल. 2021 ते 2025 पर्यंत भारत महिलांच्या स्थितीविषयी संयुक्त राष्ट्र आयोगाचा सदस्य असेल.